पुणेकर जगात भारी! 10 वी पास शेतकऱ्यानं भंगारातून बनवली 'व्हिंटेज कार'

Pune News : पुण्यात एका शेतकऱ्याने स्वतःच्या कष्टावर एक विंटेज कार तयार केली. अवघ्या अडीच महिन्यात केवळ भंगारातून शेतकऱ्याने ही कार तयार केली आहे. शेतकऱ्याच्या या कारची सध्या मावळसह पुणे जिल्ह्यात चर्चा सुरु आहे.

Updated: Oct 26, 2023, 12:11 PM IST
पुणेकर जगात भारी! 10 वी पास शेतकऱ्यानं भंगारातून बनवली 'व्हिंटेज कार' title=

चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, पुणे : प्रत्येकाच स्वप्न असतं की आपली स्वतःची चारचाकी गाडी असावी आणि त्यात ऐटीत बसून  सफारी करून फिरावं. मावळच्या (Maval) रोहिदास नवघणे या शेतकऱ्यानेही आपल्याकडे विंटेज कार असावी असं स्वप्न पाहिलं होतं. पण लहानपणापासून मातीच्या ढेकळ्यात राहणारं शेतकरी कुटुंब असल्याने जेमतेम घरचा उदरनिर्वाह इतकेच पैसा मिळायचा. त्यामुळे विंटेज कार काय तर साधी सायकल घेणं देखील शक्य नव्हतं. पण मनात स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द कायम होती. चारचाकी गाडी विकत घेण्यासाठी लाखो रुपये मोजावे लागतात. पण शेवटी मावळातील या शेतकऱ्याने आपलं स्वप्न पूर्ण केलंच.

रोहिदास नवघणे तालुक्याचं गाव असलेल्या वडगांव मावळातील जांभूळवाडी येथे राहतात. पूर्वापार शेती हे एकच उदरनिर्वाह करण्याचे त्यांचे साधन आहे. रोहिदास नवघणे यांनी दिल्लीची देखील सफर केली होती. त्यावेळी नवघणे यांनी तिथे असलेल्या ई रिक्षा पाहिल्या. त्यानंतर घरी आल्यावर एक विंटेज कार बनवण्याचे त्यांनी ठरवले. गावातल्या भंगार दुकानातील विविध वस्तू जमवत त्यांनी गाडीचे साहित्य जमवले. त्यानंतर त्यांनी एका कागदावर आपल्या स्वप्नातील कारचे चित्र काढले आणि तिथून सुरू झाला नवघणे यांचा गाडी बनविण्याचा प्रवास. रोहिदास नवघणे यांनी इंजिनिअर किंवा त्याप्रकारचे शिक्षण घेतलेले नाही. ते केवळ दहावी पास शेतकरी आहेत. पण त्यांनी अवघ्या अडीज महिन्यात भाऊ, मुलं आणि मित्राच्या मदतीने ही कार बनवली आहे. ही गाडी बनविण्यासाठी केवळ अडीज लाख रुपयांचा खर्च नवघणे यांना आला.

नवघणे हे त्यांची जुगाड करून बनवलेली ही लाल कलरची गाडी घेऊन बाहेर गेल्यावर लोक तिला थांबवून तिच्यासोबत फोटो काढतात. ही विंटेज कार बॅटरीवर चालणारी असून यामध्ये पाच बॅटरी लावण्यात आल्या आहेत. तर तब्बल 100 किलोमीटर पर्यंत गाडी व्यवस्थित धावते. ही गाडी चार्ज करण्यासाठी 5 ते 6 तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या मेक इन इंडिया आणि ई-कार ची संकल्पना मावळातील शेतकरी रोहिदास नवघणे यांनी सत्यात उतरवली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर गाडी पूर्ण करून त्याची विधिवत पूजा करून रोहिदास नवघणे यांनी गाडी रस्त्यावर उतरवली होती. लहानपणी पाहिलेलं स्वप्न पूर्ण झाल्याने शेतकरी रोहिदास नवघणे यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. काबाड कष्ट करून बनवलेल्या चार चाकी गाडीत फिरण्याची मजा वेगळीच असल्याची भावना नवघणे कुटुंबीय व्यक्त करत आहेत.

दरम्यान सध्या या कारची चर्चा संपूर्ण मावळ तालुक्यासह  पुणे जिल्ह्यात आहे. गाडी रस्त्यावर उतरवताच या रोहिदास नवघणे यांनी संत तुकोबांचे दर्शन घेतलं होतं. स्वप्नातली उंच भरारी घेऊन एका गाडीची निर्मिती केल्याने या बळीराजाने देवाचं आभार मानायला विसरला नाही. नवघणे सारखे शेतकरी आपल्या देशातील काळ्या मातीत राबत असतील आणि त्यांच्या कल्पतेतून एखाद्या गाडीची निर्मिती होत असेल तर भारत देश हा सुजलाम सुफलाम तर आहेच पण एक दिवस संपूर्ण विश्वावर राज्य करेल यात कोणताही शंका नाही.