मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; डेक्कन एक्स्प्रेस, इंटरसिटी 'इतके' दिवस रद्द

Pune-Mumbai Railway: मुंबई-पुणे- मुंबई प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी मोठी माहिती समोर येतेय. काही दिवस प्रवाशांची गैरसोय होणार आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 23, 2024, 12:21 PM IST
मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; डेक्कन एक्स्प्रेस, इंटरसिटी 'इतके' दिवस रद्द title=
pune-mumbai intercity express and deccan express will remain closed from june 28 to 30

Pune-Mumbai Railway: पुणे-मुंबई दरम्यान धावणारी इंटरसिटी एक्सप्रेस आणि डेक्कन एक्सप्रेस 28 ते 30 जूनपर्यंत बंद राहणार आहे. पुणतांबा-कानेगाव आणि दौंड मनखाड खंड येथे सुरू असणाऱ्या दुपदरीकरणाच्या कामासाठी दोन्ही एक्स्प्रेस रद्द करण्यात येत आहे. रेल्वेच्या या निर्णयामुळं प्रवाशांना काही काळ मनस्ताप सहन करावा लागणार आहे. पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस पुढील शुक्रवारी 28 जून रोजी रद्द करण्यात येणार आहे. शनिवारी 29 जून रोजी मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेसदेखील रद्द करण्यात आली आहे. त्याच दिवशी पुणे-मुंबई इंटरसिटीदेखील रद्द करण्यात आली आहे. रविवारीदेखील पुणे-मुंबई इंटरसिटी रद्द असणार आहे. 

मुंबईकर होणार हैराण 

रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळं मुंबईहून पुणे आणि पुणे- मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो. कारण इंटरसिटी एक्स्प्रेस आणि डेक्कन एक्स्प्रेस तीन दिवसांसाठी रद्द करण्यात येणार आहे. कारण या दोन्ही ट्रेन सुपरफास्ट असून नेहमीच प्रवाशांची या ट्रेनला गर्दी असते. रेल्वे प्रशासनाने पुणे आणि मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या नागरिकांना काळजी घेण्याचे अवाहन केले आहे. 

पुणे-लोणावळा मार्गाची पाहणी

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी शनिवारी पुणे विभागातील लोणावळा-पुणे-लोणावळा रेल्वे मार्गाची पाहणी केली. महाव्यवस्थापकांनी लोणावळा-पुणे डाऊन आणि अप मार्गाच्या सर्व तांत्रिक बाबींची तपासणी केली ज्यात इलेक्ट्रिकल ओव्हरहेड उपकरणे (OHE), पुलांची स्थिती, तपासणी कोचच्या खिडकीतून सिग्नल यंत्रणा. प्रवाशांच्या सुरक्षेकडे व प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सुविधांकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश महाव्यवस्थापकांनी सर्व अधिकाऱ्यांना दिले.

दरम्यान, रेल्वे विभागाने घोरपडी येथील डिझेल लोको शेडच्या छतावर साडेसहा हजार चौरस मीटर जागेवर सोलर पॅनल बसवून वीजनिर्मिती सुरू केली आहे. डिझेल लोको शेडवर बसवलेले सोलर पॅनल वर्षाला ९.४४ लाख किलोवॅट वीज निर्माण करतील. त्यामुळं रेल्वेच्या वीजबिलात वर्षाला ५२ लाख रुपयांची बचत होणार आहे. घोरपडी येथे रेल्वेचे डिझेल लोको शेड आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी शनिवारी येथे बसविण्यात आलेल्या ६४७ किलोवॅट क्षमतेच्या सोलर पॅनलचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी डिझेल लोको शेडचीही पाहणी केली. पुणे रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक इंदू दुबे आणि इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.