किरण ताजणे, झी मीडिया पुणे: एक दोन नाही तर तब्बल 57 तरुणींना फसवणाऱ्या एका तरुणाचा भांडफो़ड झाली. धक्कादायक बाब म्हणजे त्याने आपल्या जाळ्यात तरुणींना ओढलं आणि लग्नाचं आमीष दाखवून लाखोंनी पैसे उकळले. ही धक्कादायक घटना शिक्षणाचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात घडली आहे.
पुणे आणि परिसरातल्या तब्बल 57 तरुणींना फसवणारा लखोबा आता पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. यांच्यापैकी काही जणींशी त्यानं लग्न केलं. तर बाकीच्यांना लग्नाचं आमिष दाखवून पैसे उकळले होते. पण अखेर त्याच्या पापांचा घडा भरला. तरुणींना जाळ्यात ओढणारा हा तरुण पोलिसांच्या सापळ्यात अडकला आहे.
पुण्यातला हा नवा लखोबा लोखंडे सोशल मीडियावरुन मुलींना जाळ्यात ओढायचा. एकामागोमाग एक करत त्याने तब्बल 57 मुलींना गंडवलं, चौघींबरोबर संसारही थाटला आणि त्यांच्याकडून पैसे उकळले.
पुण्यात नवा 'लखोबा लोखंडे' कोण? या आरोपीचं नाव योगेश गायकवाड आहे. मूळचा औरंगाबादमधल्या कन्नडचा राहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. स्वतः लष्करी अधिकारी असल्याची बतावणी करायचा. बसस्थानकावर एकट्या तरुणींना गाठून आधी मैत्री करायचा. मग सोशल मीडियावरुन मुलींना जाळ्यात अडकवायचा.
तरुणींना लग्नाचे आमिष दाखवायचा. त्यांच्या कुटुंबातल्या मुलाला लष्करात भरती करतो असं सांगून दोन ते तीन लाख रुपये घ्यायचे आणि पोबारा करायचा. अशी त्याची मोडस ऑपरेंडी होती हे चौकशीतून समोर आलं.
आतापर्यंत त्यानं दहा वीस नव्हे तर तब्बल 57 तरुणींना गंडा घातला. त्यांच्याकडून 53 लाख रुपये हडपले आणि त्यातल्या चौघींसोबत त्यानं लग्नही केलं. म्हणतात ना पापचा घडा भरला की आपोआप शिक्षा मिळते अगदी तसंच झालं. पुण्यातल्या एका तरुणीच्या तक्रारीनंतर या लखोबाचा भांडाफोड झाला. पोलिसांनी सापळा रचत त्याला बेड्या ठोकल्या.
आणखी कुणा मुलींना या लखोबा लोखंडेनं फसवलं असेल तर त्यांनीही पुढे या आणि तक्रार करा असं पोलिसांनीही आवाहन केलं आहे. असल्या भलत्या सलत्या लखोबांवर विश्वास ठेवून पैसे देण्याआधी शंभर वेळा विचार करा.