पुण्याच्या आदर्श सुरक्षा रक्षकावर उपासमारीची वेळ

चंद्रकांत गायकवाड यांच्यावर एका अपघातानंतर उपासमारीची वेळ आली आहे. 

Updated: Jul 18, 2019, 08:50 PM IST
पुण्याच्या आदर्श सुरक्षा रक्षकावर उपासमारीची वेळ  title=

पुणे : चांगल्या कामाची पावती आणि चांगल्या कामामुळे मि़ळालेली प्रसिद्धी तसंच प्रतिष्ठा वेळ आल्यावर निरोपयोगी ठरते. आदर्श सुरक्षा रक्षक म्हणून गौरवल्या गेलेल्या पुण्यातल्या चंद्रकांत गायकवाड यांच्यावर एका अपघातानंतर उपासमारीची वेळ आली आहे. 

नऊ वर्षांच्या कारकिर्दीत ३५ लाखांचा ऐवज परत करणारा हा सुरक्षा रक्षक. कामाची पावती म्हणून सुरक्षा पर्यवेक्षकपदी बढती मिळाली. कर्तव्यनिष्ठा आणि प्रामाणिकपणाबद्दल १२ विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं. वर्तमान पत्रांमधून उल्लेखनीय कामगिरीचं भरभरून कौतुक ही झालं होतं. 

पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे कर्मचारी असलेल्या चंद्राकांत गायकवाड यांचा हा गौरवशाली भूतकाळ. वेळप्रसंगी जीवावर उदार होऊन काम करण्याच्या वृत्तीमुळे हा सामान्य माणूस समाजात आदर्श ठरला. आज मात्र हे सारं धन बिनकामाचं ठरतं आहे. गायकवाड यांचा ६ महिन्यांपूर्वी अपघात झाला. त्यातून त्यांचं काम थांबलं, आणि त्यासोबत पगारपाणीही. गेल्या ४ महिन्यांपासून त्यांची अवस्था अतिशय हलाखीची आहे. 

जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ ही निमशासकीय संस्था आहे. विविध शासकीय तसंच गैरशासकीय आस्थापनांना सुरक्षा रक्षक पुरवण्याचं काम मंडळामार्फत चालतं. असं असताना मंडळाचा कर्मचाऱी मात्र आर्थिक दृष्टया असुरक्षित आहे. त्यामुळेच चंद्रकांत गायकवाड यांना आज कुठेच दाद मिळत नाही.