IAS Pooja Khedkar : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. पूजा खेडकर यांचा महाराष्ट्रातील जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रम स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमी यांनी दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्र शासनाने ही कारवाई केलीय. 23 जुलै पूर्वी मसूरी इथल्या अकॅडमीमध्ये पुन्हा हजर राहण्याचे पूजा खेडकर यांना आदेश देण्यात आले आहे. खाजगी गाडीवर लाल दिवा लावणे आणि स्वतंत्र केबिनसाठी आग्रह धरण यामुळे प्रोबेशनरी आयएस अधिकारी पूजा खेडकर चर्चेत आल्या होत्या. पूजा खेडकर यांच्या शारीरिक अपंगत्व (Physical Disability) आणि ओबीसी प्रमाणपत्रही (OBC Certificate) बनावट असल्याचं समोर आलं होतं. याच मुद्द्यांवर पंतप्रधान कार्यालय आणि मसूरी इथल्या लाल बहादूर शास्त्रीय प्रशासकीय अकादमीने पूजा खेडकर यांची चौकशी सुरू केली आहे.
पूजा खेडकर यांचे कारमाने
खासगी ऑडीवर लाल दिवा, महाराष्ट्र शासनची पाटी यामुळे ट्रेनी आयएएस पूजा खेडकर वादात सापडल्या. यानंतर त्यांचे व्हॉट्सअॅप चॅटही व्हायरल झाले. त्यांनी खोटे नॉन क्रिमिएल प्रमाणपत्र जोडल्याची माहिती समोर आली. यामुळे दिवसेंदिवस त्यांचा पाय आणखीनच खोलात गेला. यातच पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा पोलीस, शेतकऱ्यांवर दादागिरी करतानाचे व्हिडिओ समोर आले.
ऑडी'वाल्या कलेक्टरीण
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात पूजा खेडकर प्रोबेशनरी अधिकारी म्हणून रूज झाल्या होत्या. मात्र अवघ्या काही दिवसांतच ऑडीवाल्या कलेक्टरीण म्हणून त्या ओळखल्या जाऊ लागल्या. कारण ऑडीसारखी महागडी खासगी गाडी त्या सरकारी कामासाठी वापरत होत्या. या ऑडीवर महाराष्ट्र शासन असं स्पष्टपणं लिहिलेलं होतं. पुण्यात रूजू होण्यापूर्वीच त्यांनी कार, निवासस्थान आणि शिपाई अशा सोयीसुविधांची मागणी केली. इतकंच नाही तर वॉशरूम अटॅच नसल्यानं त्यांना देण्यात आलेला स्वतंत्र कक्ष त्यांनी नाकारला. परवानगी न घेता खेडकरांनी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या अँटी चेंबरचा ताबा घेतला. स्वतःच्या खासगी ऑडी कारवर अंबर रंगाचा दिवा लावला. खासगी ऑडी कारवर महाराष्ट्र शासन असे स्टिकर लावले.
पूजा खेडकर यांचे कथित कारनामे उघड झाल्यानंतर आता त्यांची पुण्यातून वाशिमला बदली करण्यात आली. 11 जुलै 2024 पासून ते 6 एप्रिल 2025 पर्यंतचा हा त्यांच्या प्रशिक्षणाचा कालावधी होता. पण हा प्रशिक्षण कालावधी आता स्थगित करण्यात आला आहे.
चुकीच्या कागदपत्रांच्या माध्यमातून निवड?
आयएएस पदापर्यंत पोहोचण्यासाठी पूजा खेडकर यांनी चुकीची कागदपत्रे सादर केल्याचा आरोप आहे. चुकीच्या कागदपत्रांच्या माध्यमातून पूजा यांची निवड झाली का? असा प्रश्न उपस्थित होतोय.या पार्श्वभूमवर पंतप्रधान कार्यालयातून यासंदर्भातील माहिती मागवण्यात आली आहे.
पूजा खेडकर यांच्यावर कारवाई?
जर चुकीच्या किंवा बोगस गोष्टी घडल्या असतील तर कुणालाही सरकार पाठिशी घालणार नाही, मग ते आयएएस अधिकारी असेले तरी अशी प्रतिक्रिया भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. देशाच्या विकासात महत्त्वाचे योगदान देणारे अधिकारी म्हणून हे अधिकारी बसत असतात. त्यांच्या निवडीवर असे प्रश्न उपस्थित होत असतील तर ते गंभीर आहे. त्यांना थारा देता कामा नये, कठोर कारवाई केली जाईल. या प्रवृत्ती शोधून मुळापासून नष्ट केल्या पाहिजेत असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.