आताची मोठी बातमी! पुणे ड्रग्स रॅकेटच्या मास्टरमाईंडचं नाव समोर, अशी केली सुरुवात

Pune Drugs Racket : पुणे ड्रग्जचं पंजाब आणि इंग्लंड कनेक्शन उघड झालंय. आता ड्रग्ज रॅकेटचा मास्टरमाईंडचं नाव समोर आलं आहे.  कोडवर्डच्या माध्यमातून सुरु होती ड्रग्जची तस्करी होती. 

सागर आव्हाड | Updated: Feb 22, 2024, 10:08 PM IST
आताची मोठी बातमी! पुणे ड्रग्स रॅकेटच्या मास्टरमाईंडचं नाव समोर, अशी केली सुरुवात title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्स प्रकरणात आताची सगळ्यात मोठी अपडेट समोर आली आहे. ड्रग्स रॅकेटमधील मास्टरमाईंडचं (Pune Drugs Rackets) नाव समोर आलं आहे. ड्रग्स प्रकरणातील मास्टरमाईंडचं नाव संदीप उर्फ सनी धूनिया (Sandeep Dhunia) असं आहे. धूनिया हा मूळचा पाटणाचा असून त्याचं कुटुंब लंडनमध्ये वास्तव्यास आहे.  2016 मधील कुरकुंभ इथं मारलेल्या छाप्यात सनी याला पकडण्यात आलं होतं. यावेळी 350 किलोचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते या प्रकरणात सनी धूनिया कारागृहात शिक्षा भोगत होता. याच ठिकाणी वैभव माने आणि हैदर शेख यांच्याशी त्याची ओळख झाली आणि या ड्रग्स प्रकरणाला सुरुवात झाली. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या विविध टीम सनी याचा शोध घेत आहेत.

पुणे ड्रग्स प्रकरणाचं लंडन कनेक्शन
पुणे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरणातलं लंडन कनेक्शन (London Connection) समोर आलंय. एमडी ड्रग्जची निर्मिती पुण्यातल्या कुरकुंभमध्ये होत होती. मात्र त्याची विक्री लंडनमध्ये केली जात होती. रेडी टू ईड फूट पाकिटांच्या माध्यमातून एम डी ड्रग्स लंडनमध्ये पोहोचवलं जात होतं. दिवेश भुटीया, संदीप कुमार, संदीप यादव या तिघांवर ड्रग्ज लंडनला पाठवण्याची जबाबदारी होती. दिवेश भुटीया आणि संदीप कुमार हे दोघेही फूड कुरियरचा व्यवसाय करत होते. कुरकुंभ MIDC कारखान्यातला मुद्देमाल आधी दिल्लीत पोहोचवला जायचा. मग तिथून तो लंडनला कुरियर केला जात होता. आतापर्यंत दिल्लीतून लंडनमध्ये 4 पार्सल पाठवण्यात आल्याची माहिती समोर आलीय.

आरोपींच्या नावाचं कोडिंग
पुणे ड्रग्सप्रकरणात नवनवीन खुलासे होतायत. मेफेड्रॉनची तस्करी करण्यासाठी आरोपींच्या नावांचं कोडिंग करण्यात आलं होतं. त्याद्वारे ते एकमेकांशी संवाद साधत होते. लंबा बाल, मुंबई का बंदर, नमक पार्सल अशा कोडिंगद्वारे अमली तस्कर एकमेकांच्या संपर्कात होते.

पुण्यात 4 हजार कोटींचं ड्रग्स जप्त
पुण्यात गेल्या तीन ते चार दिवसांत चार हजार कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलंय.. दोन हजार किलो एमडी ड्रग्ज पुणे पोलिसांनी जप्त केलंय.. पुणे, विश्रांतवाडी, कुरकुंभ, दौंड आणि राजधानी दिल्लीमध्ये गेल्या तीन दिवसांत ही कारवाई करण्यात आलीय. पुण्यात एमडी ड्रग्ज बनवण्याच्या फॉर्म्युलाच्या कोड वर्ड देण्यात आला होता. न्यू पुणे जॉब असं या कोड वर्डचं नाव होतं. न्यू पुणे जॅाबची जबाबदारी युवराज भुजबळवर होती. ऑक्टोबर 2023 पासूनच एमडी ड्रग्जची निर्मिती सुरु होती.

रवींद्र धंगेकर यांचा आरोप
पुण्यात अनेक ललित पाटील कार्यरत आहेत, पबमध्ये सर्रास ड्रग्ज मिळतात, असा दावा काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांनी केलाय. पब्सच्या नवीन नियमावलीवरुन त्यांनी पुणे पोलिसांवरही निशाणा साधलाय..