Pune Drugs Case : पुण्यातून 4000 कोटींचे एमडी ड्रग्स जप्त, सांगलीपासून थेट इंग्लंडपर्यंत कनेक्शन

Pune Drugs Case : महाराष्ट्रातील पुणे पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी अमली पदार्थ विरोधी कारवाई केली आहे. पुणे पोलिसांनी तीन दिवसांत 4000 कोटी रुपयांचे 2000 किलो एमडी ड्रग्ज (मेफेड्रोन ड्रग) जप्त केले आहे. 

श्वेता चव्हाण | Updated: Feb 22, 2024, 01:14 PM IST
Pune Drugs Case : पुण्यातून 4000 कोटींचे एमडी ड्रग्स जप्त, सांगलीपासून थेट इंग्लंडपर्यंत कनेक्शन title=

Pune Drugs Case : गेल्या तीन दिवसांपासून पुणे पोलिसांनी आतापर्यंत साडेतीन हजार कोटींचा मेफेड्रोन म्हणजेच एमडी जप्त केला आहे. पुणे, कुरकुंभ आणि दिल्लीपाठोपाठ सांगली जिल्ह्यातूनही अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. पुणे, दिल्ली पाठोपाठ सांगली जिल्ह्यातील कुपवाड एमआयडीसीमध्ये 300 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. दरम्यान पुणे पोलिसांनी मंगळवारी (20 फेब्रुवारी) कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीवर छापा टाकून 1000 कोटी रुपयांचे 500 किलो एमडी आणि विश्रांतवाडी येथून 100 कोटी रुपयांचे 50 किलो एमडी जप्त केले. याशिवाय गुन्हे शाखेच्या पथकाने दिल्लीतील एका कंपनीवर छापा टाकून 800 कोटी रुपयांचे एमडी जप्त केले. तर बुधवारी (21 फेब्रुवारी) सांगलीतून 10 किलो एमडी जप्त करण्यात आला आहे. याशिवाय आणखी 50 किलो एमडीसाठी शोध सुरू असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली. 

या सर्व कारवाईत एकूण आठ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. देशात अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये बडे तस्कर गुंतले असून त्यांच्या तपासासाठी अंमली पदार्थ नियंत्रण संचालनालयाच्या (एनसीबी) मदतीने देशभरात तपास सुरू करण्यात आला आहे. पुण पोलिसांच्या विविध पथकांनी पुणे, विश्रांतवाडी, कुरकुंभ, दौंड आणि राजधानी दिल्ली त्यानंतर इंग्लंड येथे अमली पदार्थ विरोधी कारवाया केल्या आहेत.  

दरम्यान पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने दिल्लीच्या सांगलीत छापा टाकून मेफेड्रोन (MD)जप्त केली. दिल्लीत केलेल्या कारवाईदरम्यान पोलिसांनी 970 मेफेड्रोन जप्त केले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आले. पुणे पोलिसांनी आतापर्यंत साडेतीन हजार कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले आहे. दिवेश चिरंजीत भुतिया, संदीप राजपाल कुमार यांना अटक केल्यांची नावे आहेत.  

पुणे-सोलापूर महामार्गावरील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीत मेफेड्रोनचे उत्पादन करणाऱ्या अर्थकेम लॅबोरेटरीज कंपनीचे मालक भीमाजी उर्फ ​​अनिल परशुराम साबळे (वय 45), अभियंता युवराज बब्रुवन बाळभुज (वय 40) यांना पकडण्यात आले. यापूर्वी गुंड वैभव उर्फ ​​पिंट्या भरत माने (वय 42, रा. खडीचे मैदान, सोमवार पेठ), हैदर नूर शेख (वय 40, रा. विश्रांतवाडी), अजय अमरनाथ करोसिया (वय 35) यांना अटक करण्यात आली होती. मेफेड्रोन तस्करी प्रकरणात वैभव उर्फ ​​पिंट्या माने, हैदर शेख, अजय करोसिया या गुंडांना गुन्हे शाखेने सोमवारी अटक केली. त्यांच्याकडून साडेतीन कोटी रुपयांचा मेफेड्रोन जप्त करण्यात आला आहे. ड्रग्स रॅकेट चा 'मास्टर माईंड' हा मूळचा पंजाब प्रांतातील आहे.  कुटुंबीयांसह गेल्या अनेक वर्षांपूर्वी इंग्लंड मध्ये स्थानिक होते. 2016 मधील कुरकुंभ येथे मारलेल्या छाप्यात त्याला पकडण्यात आले होते.