Thane News Today: तुम्ही कधी बस स्टॉप चोरीला गेल्याचे ऐकले आहे का? पण ही घटना चक्क मुंबईनजीकच्या ठाण्यात घडली आहे. ठाण्यात चक्क बस स्टॉपच चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. हे ऐकून तुम्हीही बुचकळ्यात पडलात ना? मात्र हे खरं आहे. तब्बल सहा दिवसांनंतर बा बस स्टॉप शोधण्यास यश आलं आहे.
नौपाडा पोलीस ठाणे परिसरातून अवघ्या 100 मीटर अंतरावर असलेला बस स्टॉप एका रात्रीत गायब झाल्याची घटना गुरुवारी घडली होती. या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 379 अंतर्गंत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संपूर्ण बस स्टॉपच चोरीला गेल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
रहिवाशांनी ही घटना उघडकीस आणल्यानंतर रहिवाशांनी पोलिस ठाणे आणि ठाणे महानगरपालिकेकडे तक्रार केल्यानंतर तातडीने नवीन बस स्टॉप बसवण्यात आला. मात्र, बस स्टॉप कोणी चोरी करुन नेला हे तपासण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासण्याची एक पथक तैनात करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी बस स्टॉप घेऊन जाणारा ट्रक सापडला आहे. पोलिस या ट्रकची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत असून या मागे कोण सूत्रधार आहे, हे तपासण्याचे काम करत आहेत.
रहिवाशांनी बस स्टॉप हरवल्याची तक्रार दिल्यानंतर महानगरपालिकेने लगेचच संबधित ठेकेदाराला नवीन बस स्टॉप बसवण्याचे आदेश दिले. तसंच, परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याची विनंती केली. त्यानंतर लगेचच तिथे बसस्टॉप बसवण्यात आला. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
धक्कादायक म्हणजे, शुक्रवारी चोरी झालेला बस स्टॉपचा पूर्ण लोखंडी ढाचा सहा दिवसांनंतर सापडला आहे. कॅडबरी उड्डाणपुलाखाली भंगारात हा ढाचा सापडला होता. पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षात बस स्थानक चोरीला गेल्याची ही तिसरी घटना आहे. गोखले रोडवरील टिप टॉप, तीन हात नाक्याजवळील बस स्टॉपदेखील या पूर्वी चोरीला गेल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र नौपाडा पोलिस स्टेशन बसस्थानकापासून केवळ 100 मीटर अंतरावर असलेल्या भागातून बसस्टॉप चोरीला जाऊ शकतो ही बाब खूप गंभीर आहे. या भागात पोलिसांची गस्त असतानाही एका रात्रीत बस स्टॉप चोरीला कसा जाऊ शकतो, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.