MPSC मध्ये नेहमीच अपयश; यश मिळवण्यासाठी तरुणाने प्यायले महिलेचे पाय धुतलेले पाणी

Pune Crime : पुण्यात भोंदूगिरीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या एका तरुणाला नैराश्याला कंटाळून एका महिलेचा सल्ला घेणे चांगलेच महागात पडलं आहे. महिलेने साथीदारांच्या मदतीने तरुणाकडून दीड लाख रुपये लुबाडले आहेत.

आकाश नेटके | Updated: Dec 17, 2023, 01:15 PM IST
MPSC मध्ये नेहमीच अपयश; यश मिळवण्यासाठी तरुणाने प्यायले महिलेचे पाय धुतलेले पाणी title=
(फोटो सौजन्य - सोशल मीडियावरुन साभार)

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : सुसंस्कृत म्हणवल्या जाण्याऱ्या पुण्यामध्ये (Pune Crime) भोंदूगिरीचा (Black Magic) एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. नैराश्य दूर करून स्पर्धा परीक्षेत यश मिळवून देण्यासाठी एका तरुणाला महिलेचे पाय धुतलेले पाणी प्यायला दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या सगळ्या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. या तरुणाची दीड लाख रुपयांची फसवणूक झाल्याचेही समोर आली आहे. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी दोन महिलांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्पर्धा परीक्षेतील अपयशामुळे नैराश्याने ग्रासलेल्या तरुणाला पाय धुतलेलं पाणी प्यायला देत दीड लाखाचा गंडा घालण्यात आलाय. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हा प्रकार उघडकीस आणला आहे. तरुणाची फसवणूक करणाऱ्या महिलेला तिच्या साथीदारासह अटक करण्यात आली आहे. वृषाली संतोष ढोले असं अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे. ही महिला कन्सल्टन्सीच्या नावाखाली भोंदूगिरी करत असल्याचं निष्पन्न झालंय. पाषाण परिसरात राहणाऱ्या 23 वर्षाच्या तरुणाने तिच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दिली होती. 

स्पर्धा परीक्षांतील अपयशामुळे या तरुणाला नैराश्य आलं होतं. सोशल मीडियावरील जाहिरात पाहून तो उपचारांसाठी वृषाली ढोले हिच्याकडे गेला. त्यानंतर त्याच्या समस्या अतींद्रिय शक्तीद्वारे ओळखल्या दावा महिलेनं केला. इतकच नाही तर तुझं आयुष्य केवळ 30 वर्षापर्यंत आहे असं सांगून तिनं तरुणाला वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा करायला भाग पाडलं. त्यानंतर वैशालीने त्याला राख खायला दिली. तसेच हातात एक गंडा देखील बांधला. गंडा न बांधल्यास त्याचा मृत्यू होईल अशी भीती देखील वैशालीन त्या तरुणाला दाखवली. तसेच त्याच्याकडून उपचारांच्या नावाखाली दीड लाख रुपये उकळले. हा संपूर्ण प्रकार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते विशाल विमल यांना कळला. त्यावेळी त्यांनी चतुशृंगी पोलिसांना सोबत घेत या भोंदूगिरीचा पर्दाफाश केला.