पुण्यात रक्षकच बनले भक्षक, अल्पवयीन प्रेमी युगुलाला पोलिसांनी डांबलं; मुलीवर सलग 5 दिवस...

Pune Crime: पीडित मुलीच्या तक्रारीनंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. अनिल पवार याची पत्नी संचालक असलेल्या सिद्धार्थ मल्टीपर्पज एनजीओच्या माध्यमातून हे रॅकेट सुरू होतं. 

अरूण म्हेत्रे | Updated: Nov 7, 2023, 05:31 PM IST
पुण्यात रक्षकच बनले भक्षक, अल्पवयीन प्रेमी युगुलाला पोलिसांनी डांबलं; मुलीवर सलग 5 दिवस... title=

अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे: पुण्यामध्ये रक्षकच भक्षक बनल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. स्वतःचं घर सोडून आलेल्या अल्पवयीन मला - मुलींना वासनेची शिकार बनवण्याचा धंदा पुणे स्टेशन परिसरामध्ये सुरू होता.  पुणे रेल्वे स्टेशनवर कार्यरत असणारा आरपीएफचा कर्मचारी आणि रेल्वेच्याच इमारतीमध्ये कार्यालय असलेल्या एनजीओचा या गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचं निष्पन्न झालं आहे. दरम्यान या घटनेला एक महिना झाला तरी आरोपी सापडत नसल्याने मनसे आक्रमक झाली आहे. या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

रेल्वे प्रोटेक्शन फोर्स मध्ये कार्यरत असलेला हेड कॉन्स्टेबल अनिल पवार याचे दुष्कृत्य समोर आले आहे. खरंतर रेल्वे स्टेशनवर आढळून येणाऱ्या पिडीतांना संरक्षण देणं हे त्याचं काम होतं. पण अनिल पवार आणि त्याच्या साथीदारांनी माणुसकीला काळं फासण्याचा उद्योग केलाय. लग्न करण्यासाठी म्हणून छत्तीसगडहून पुण्यात आलेल्या अल्पवयीन प्रेमी युगुलाला त्यांनी डांबून ठेवलं. मुलासोबत असलेल्या मुलीवर सलग 5 दिवस बलात्कार केला. 

पीडित मुलीच्या तक्रारीनंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. अनिल पवार याची पत्नी संचालक असलेल्या सिद्धार्थ मल्टीपर्पज एनजीओच्या माध्यमातून हे रॅकेट सुरू होतं. 

एनजीओच्या रजिस्टरमध्ये आतापर्यंत सुमारे साडेतीनशे अल्पवयीन मुला मुलींची नोंद आढळून आली आहे. त्यातील अनेकांवर अत्याचार तसेच शोषण झालं असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 मुख्य आरोपी अनिल पवार सध्या फरार आहे. त्याचा साथीदार कमलेश तिवारीसह तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रकरणाचं स्वरूप बघता त्यामध्ये एक मोठं रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता आहे. या रॅकेटला कुणाचा वरदस्त होता याचा देखील खुलासा होणं आवश्यक आहे.

हे प्रकरण समोर आल्यानंतर मनसे नेते वसंत मोरे आक्रमक झाले आहेत. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह एनजीओचे कार्यालय फोडले आहे.