नांदेड हादरले! पोत्यात तलवारी भरून आणल्या, 20 ते 22 जणांच्या टोळक्याकडून तरुणाची हत्या

Nanded Crime News Today:  पोत्यात तलवारी भरून आणून एका गँगने तिघांवर सपासप वार केले यात एका युवकाचा मृत्यू तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. 

सतिश मोहिते | Updated: Nov 7, 2023, 05:12 PM IST
नांदेड हादरले! पोत्यात तलवारी भरून आणल्या, 20 ते 22 जणांच्या टोळक्याकडून तरुणाची हत्या  title=
nanded news 20 to 25 gangmember attack on youth by Sword

Nanded Crime News: नांदेडमध्ये एक भयंकर घटना घडली आहे. काही तरुण पोत्यात तलवारी भरुन घेऊन आले आणि या गँगने तिघांवर सपासप वार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Nanded News) 

नांदेड शहरातील गजबजलेल्या सराफा बाजारात काल रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. मयत सागर पवार हा डेली निड्स आणि फायनान्सच्या व्यवसायात आहे. मोक्काचा आरोपी असलेल्या केशव पवारने सागरकडे खंडणी मागितली होती. खंडणी देण्यावरून दोघांमध्ये फोनवरून वाद झाला होता. या वादातूनच आरोपी केशवने सागरवर वार केले आहेत. 

काय घडलं नेमकं?

केशव पवार आपल्या गँगमधील 20 ते 22 जणांसोबत रात्री सागर यादव याला शोधत सराफा बाजारात आला होता. इतकंच नव्हे तर त्याने पोत्यात भरुन तलवारी आणल्या होत्या. पोत्यात आणलेल्या एक एक तलवारी आणि खंजर काढत केशव पवारच्या गँगने सागर यादव आणि त्याच्या भावासह अन्य एकावर हल्ला चढवला. तलवारीचे वार झेलत सागरचा भाऊ कसाबसा जीव वाचवून घटनास्थळावरुन पळाला. पण सागर हल्लेखोरांच्या तावडीत सापडला. 

20 ते 22 जणांकडून वार

20 ते 22 जणांच्या टोळक्यांनी सागरवर तलवारीने अनेक वार करण्यात आले. अनेक गंभीर वार झाल्याने सागरचा तडफडून मृत्यू झाला. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याघटनेने जुन्या नांदेड शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

17 जणांना अटक 

आरोपी केशव पवारसह 20 ते 25 जणांविरोधात हत्या, खंडणी आणि इतर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणातील 17 आरोपींना अटक करण्यात आली असून मोक्कांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली आहे.