Pune Crime News Varkari Educational Institution: विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्याला हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. पुण्यातील आळंदीमध्ये वारकरी शिक्षण देणाऱ्या संस्था चालकाने संस्थेतील 3 विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आळंदी पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव दासोपंत उंडाळकर असं असून तो 52 वर्षांचा आहे. या घटनेतील तिन्ही पीडित मुले अल्पवयीन आहेत.
आळंदी पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, मुलांवर अनैसर्गिक अत्याचार केले जात होते. गेल्या 15 दिवसांपासून मुलांवर आरोपी अनैसर्गिक अत्याचार करत होता. आळंदीत वारकरी शिक्षण देणारी संस्था चालवणारा दासोपंत उंडाळकर हा संस्थाचालक कमी आणि शिक्षक म्हणूनच जास्त वावरायचा. दासोपंतने आपल्याच विद्यार्थ्यांना वासनेचं शिकार बनवलं. दासोपंत ज्या संस्थेचा संस्थाचालक आहे तिथे 70 मुले वारकरी शिक्षण घेत असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
दासोपंतकडे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी 3 अल्पवयीन मुलांना दासोपंत एकांकात बोलवायचा. गेल्या १५ दिवसांपासून दासोपंत या 3 अल्पवयीन मुलांना एकांतात बोलावून त्यांच्यावर अनैसर्गिक अत्याचार करायचा. या सर्व धक्कादाय प्रकाराबद्दल पीडित मुलांनीच पहिल्यांदा खुलासा केल्याने दासोपंतचा भांडाफोड झाला. मुलांनी त्यांच्यावर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरोधात हिंमत दाखवून वाच्यता केल्याने ही धक्कादायक घटना उघडकीस आल्याचं एका नामांकित वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
तिन्ही पीडित मुलांनी त्यांच्या पालकांना दासोपंत एकांतात बोलवून करत असलेल्या दुष्कृत्याबद्दल सांगितल्यानंतर हा गंभीर प्रकार उजेडात आला आहे. या प्रकरणी पीडित मुलांच्या पालकांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे आळंदी पोलिसांनी आरोपी दासोपंत उंडाळकरला अटक केली आहे. वारकरी शिक्षण देणाऱ्या संस्थेतच अता धक्कादायक आणि लाजीरवाणा प्रकार घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
सदर संस्थेमध्ये एकूण 70 मुलं असून त्यांचीही चौकशी केली जाणार आहे. संस्थेतील इतर मुलांची देखील काळजीपोटी विचारपूस केली जाईल असं पोलिसांनी सांगितलं आहे. यापूर्वीही असे काही प्रकार घडले होते का? इतर विद्यार्थ्यांना असा काही अनुभव आला आहे का यासंदर्भातील चाचपणीही पोलीस तपासादरम्यान केली जाणार असल्याचं समजतं. या प्रकरणामध्ये संस्थेतील इतर शिक्षक वर्ग आणि पालकांकडेही विचारपूस केली जाईल असं सांगितलं जात आहे.