पुण्यात 'उडता पंजाब' शिक्षणाचं माहेरघर अडकले ड्रगच्या विळख्यात...

शिक्षणाचं माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यात विद्यार्थी नेमक काय करतायत ? पुण्यात गेल्या काही काळात मोठ्याप्रमाणावर ड्रग्स जप्त  धक्कादायक म्हणजे उच्च भ्रू घटकातील तरुण तरुणीचा यात समावेश आहे..

सागर आव्हाड | Updated: May 31, 2023, 05:20 PM IST
पुण्यात 'उडता पंजाब' शिक्षणाचं माहेरघर अडकले ड्रगच्या विळख्यात... title=

सागर आव्हाड, झी मीडिया,पुणे : विद्येचं माहेरघर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुणे (Pune) शहराला ड्रग्सचा (Drugs) विळखा पडलाय. यामागचं कारण आहे पुण्यात खुलेआम सुरू असलेली ड्रग्जची विक्री. पुणे पोलीस आणि कस्टम विभागानं (Customs Department) कारवाई करत कोट्यवधींचं ड्रग्स जप्त केलंय. 29 मे रोजी खेड शिवापूर टोल नाक्यावर एका वाहनातून 850 ग्रॅम ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं. याप्रकरणी सखोल तपास केल्यानंतर पुणे पोलिसांनी लोणावळ्याजवळ (Lonavala) आणखी 200 ग्रॅम मेथॅम्फेटामाइन जप्त केलंय. या  ड्रग्जचा वापर कृत्रिम औषध, उत्तेजक म्हणून बेकायदा वापर केला जातो. तर कस्टम विभागानं लोणी काळभोर परिसरातून 36 लाख रूपयांचं म्यॅव म्यॅव ड्रग्ज जप्त केलंय. या ड्रग्जला एमडी (MD Drugs) म्हणजे मेफीड्रोन ड्रग्ज (Mephidrone) असंही म्हंटलं जातं. उरळी कांचनच्या रस्त्यावर जितेंद्र दुवा नावाचा ड्रग्जमाफिया मॅफीड्रोन आणि बंटा गोळ्या या अमली पदार्थांची विक्री करत होता. त्याची झडती घेतली तेव्हा कस्टमच्या हाती मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्सचा साठा लागला.

'मेथॅम्फेटामाइन' म्हणजे काय?
मेथॅम्फेटामाइन (Methamphetamine) हा एक उत्तेजक आणि मादक पदार्थ आहे. याच्या सेवनानं सेंट्रल नर्व्हस सिस्टीमवर (Central Nervous System) (मज्जासंस्था) थेट परिणाम होतो. मेथॅम्फेटामाइनचं सेवन केल्यास मेंदूमध्ये असणारं डोपामाइन वाढतं. त्यामुळे मनात समाधान आणि आनंदाची भावना निर्माण होते, एनर्जी वाढतेय. पुढे ही सवय व्यसनात बदलते अणि अतिसेवनामुळे मृत्यू ओढावू शकतो. ड्रग्सच्या ओव्हरडोजमुळे जे मृत्यू होतात त्यापैकी 15 % मृत्यू हे मेथॅम्फेटामाइनच्या ओव्हरडोजमुळे झाल्याचं दिसतं. 

पुण्यात पोलिसांची कारवाई
1 जानेवारी ते 30 मे 2023 म्हणजे आतापर्यंत पुण्यात जवळपास साडेसाह कोटी रुपयांचं 207 किलो अंमलीपदार्थ जप्त करण्यात आले आहेत. त्याआधी कस्टम विभागाने खेड शिवापूर इथं तब्बल पाच कोटी रुपयांचे अंमलीपदार्त जप्त केले.  50 प्रकरणात आतापर्यंत 66 जणांना अटक करण्यात आली आहे. 

आठवडाभरात तिसरी कारवाई
विशेष म्हणजे आठवड्याभरातली ही सलग तिसरी कारवाई आहे. कहर म्हणजे त्याआधी काही दिवसांपूर्वीत पुण्यात अंमली पदार्थांची ऑनलाईन डिलिव्हरी सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला होता. याहीप्रकरणात पोलिसांनी 51 लाख रूपयांचा LSD या अंमली पदार्थाचा साठा जप्त केला होता. तसच 5 आरोपींना अटक केली होती. यावरून सुसंस्कृत पुणे शहर ड्रग्सच्या विळख्यात कसं अडकत चाललंय हेच अधोरेखित होतोय.