Pune Crime News 11 Standard Girl Attacked In Shukravar Peth: पुण्यातील शुक्रवार पेठेमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एकतर्फी प्रेमामधून तरुणीवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न झाला असून संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सदर प्रकार घडल्यानंतर एका प्रत्यक्षदर्शी महिलेनं आरडाओरड केल्याने तरुणीचा जीव थोडक्यात वाचला. या महिलेमुळे सदाशिव पेठेत घडलेल्या हल्ल्याच्या घटनेची पृनरावृत्ती टळली आहे.
समोर आलेले्या माहितीनुसार, 11 व्या इयत्तेमध्ये शिकत असलेल्या मुलीला भररस्त्यात आडवून तिच्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. ही मुलगी आरोपीशी बोलत नव्हती म्हणून तिच्यावर हल्ला करण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी असलेल्या एका महिलेने आरडाओरड केल्याने बाईकवरुन आलेले दोन्ही आरोपी घटनास्थळावरुन पळून गेले. मुलीला कोयता फेकून मारण्याचा प्रयत्न केल्यानंतर आरोपी पडलेला कोयता उचलण्यासाठी बाईकवरुन उतरला. त्याने रस्त्यावर पडलेले कोयता उचलला. पण तितक्यात या बाईने आरडाओरड केला. लोक जमा होऊन आपण पकडले जाऊ या भीतीने आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला. या प्रकरणामध्ये खडक पोलीस ठाण्यामध्ये महेश सिद्धप्पा भंडारी आणि त्यांच्याबरोबर असलेल्या एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करुन घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महेश आणि संबंधित मुलगी एकमेकांना आधीपासून ओळखतात. ही मुलगी आणि तिच्या 3 मैत्रिणी दुपारी सुभाषनगर येथील गल्ली क्रमांक 6 मधून जात होत्या. त्याचवेळेस महेश आणि त्याचा मित्र बाईकवरुन तिथं आले. बाईकवर मागील बाजूस बसलेल्या महेशकडे कोयता होता. या वेळी महेश आणि या मुलीमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर त्याने हातातल्या कोयत्याने मुलीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथे असलेल्या एका महिलेने आरडाओरड करुन लोकांचं लक्ष वेधून घेतलं. दरम्यान जमीनीवर पडलेला कोयता उचलून पुन्हा हल्ला करण्याच्या प्रयत्नात असलेल्या महेशने कोयता उचलून लोक जमा होतील या भीतीने घटनास्थळावरुन पळ काढला.
नक्की वाचा >> पुणेकरांनो असे चोरीला जातात तुमचे मोबाईल! बसमध्ये चढण्यासाठी अल्पवयीन मुलं..; हा घ्या पुरावा
सदर मुलीकडून अद्याप पोलिसांकडे तक्रार देण्यात आलेली नाही. तरीसुद्धा पोलिसांनी या प्रकरणाची स्वत: दखल घेत कारवाईला सुरुवात केली असून गुन्हा दाखल केला आहे. काही महिन्यांपूर्वी पुण्यातील सदाशिव पेठेत पेरुगेट पोलीस चौकीजवळ एका तरुणीवर एकतर्फी प्रेमातून कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न झाला होता. सुभाषनगरमधील या हल्ल्यामुळे सदाशिव पेठेतील हल्ल्याच्या कटू आठवणी पुन्हा चर्चेत आल्या आहेत.