तरुणींशी लिफ्टच्या बहाण्याने जवळीक, पुढे जाऊन कंबर, छातीवर घाणेरडा स्पर्श; पुण्याच्या रस्त्यावर संतापजनक प्रकार

Pune Crime News: अनुप प्रकाश वाणी असे याचे नाव असून याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. आरोपीला पोलीसी खाक्या दाखवल्यावर तो पोपटाप्रमाणे बोलू लागला.

Pravin Dabholkar | Updated: Jul 14, 2023, 10:47 AM IST
तरुणींशी लिफ्टच्या बहाण्याने जवळीक, पुढे जाऊन कंबर, छातीवर घाणेरडा स्पर्श; पुण्याच्या रस्त्यावर संतापजनक प्रकार  title=

Pune Crime News: महाराष्ट्रातील पुणे शहरात अनेक शिक्षण संस्था आहेत. राज्यातील गाव-खेड्यातील तरुण तिथे शिक्षणासाठी जातात. म्हणूनच पुण्याला विद्येचे माहेरघर असे म्हटले जाते. पण याच पुण्यातील रस्त्यांवर एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. आजारी असल्याचा बहाणा करुन स्वत:च्या गाडीवर पुढे नेण्याच्या बहाण्याने तरुणींसोबत अश्लील चाळे होत असल्याची घटना पुण्यातील सदाशिव पेठ येथून समोर आली आहे. यामुळे पीडित तरुणीला जबर धक्का बसला असून परिसरातही खळबळ माजली आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

फिर्यादी युवतीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार ती आणि तिची मैत्रीण सोनापती बापट रोडवरुन हातात सायकल घेऊन चालत जात होत्या. बालभारती इमारतीच्या समोर दोघी होत्या. दरम्यान एक साधारण 45 वर्षांचा अनोळखी इसम त्यांच्याजवळ आला आणि चक्कर आल्याचे सांगू लागला. त्याच्याजवळ स्कूटी होती. मला चक्कर येतेय तुम्ही मला माझ्याच स्कूटीवर पुढे सोडा अशी विनवणी तो मुलींकडे करु लागला. मुलींना त्याची दया आली आणि माणूसकीच्या नात्याने तरुणीने त्याची स्कूटी चालवायला घेतली आणि इसम मागे बसला. 

इथपर्यंत सर्वकाही ठिक होतं. पण पुढे गेल्यावर जो काही प्रकार घडला तो माणुसकीला काळीमा फासणारा तर होताच पण तितकाच संतापजनक आणि किळसवाणा देखील होता. काही अंतर पुढे गेल्यावर हा इसम फिर्यादी तरुणीचा गैरफायदा घेऊ लागला. तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करु लागला. त्याने तिच्या कंबर आणि छातीवर घाणेरडे स्पर्श करायला सुरुवात केली. यामुळे फिर्यादी तरुणी चांगलीच हादरली. जसजसे अंतर पुढे जात होते. इसमाचे चाळे अधिकच वाढू लागले होते. 

आता ही बाब सहन करण्याच्या खूपच पलीकडे गेली होती. त्या मुलीने इसमास आहे त्या जागेवर सोडले. काही वेळात तिची मैत्रिण सायकलवरुन तिथे आली. त्यानंतर पीडित तरुणीने घडलेला सर्व प्रकार आपल्या मैत्रिणिला सांगितला. तरुणींनी पोलिसांना ट्विटरवरुन यासंदर्भातील तक्रार दिली.  6 जुलै 2023 रोजी रात्री 10 वाजता ही घटना घडली होती. ट्विटरवर आलेली माहिती तात्काळ चतुःश्रृंगी पोलिसांना देण्यात आली.
 
पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत वेगाने कारवाई सुरु केली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरा तपासण्यात आले. आणि आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला. अनुप प्रकाश वाणी असे याचे नाव असून याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. आरोपीला पोलीसी खाक्या दाखवल्यावर तो पोपटाप्रमाणे बोलू लागला. आपण याआधी अनेक महिला आणि तरुणींना अशाप्रकारे विनयभंग केल्याचे त्याने मान्य केले. अशा प्रकारची घटना घडल्यास पोलिसांकडे तक्रार करावी. पोलीस आपल्या नेहमी सोबत आहेत. दिलेल्या तक्रारीवर तात्काळ कारवाई केली जाईल असे आवाहन पोलीस आयुक्त रितेश कुमार आणि सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केले आहे.