Pune Drunken Girl Rada: 31 डिसेंबर 2023 रोजी पार्टी करुन अनेकांनी नववर्षाचे स्वागत केले. यावेळी चौकाचौकात सेलिब्रेशन सुरु होते. याच सेलिब्रेशनला गालबोट लावण्याचे काम अनेक ठिकाणी झाले. त्यात पुण्यातील तरुणीचाही समावेश आहे. दारुच्या नशेत हिने सोसायटीत हंगामा केला. पण बड्या पोलीस अधिकाऱ्याची मुलगी असल्याने तिला सोडून देण्यात आल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. काय आहे ही घटना? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. पुण्यात 31 डिसेंबरच्या रात्री एक विचित्र प्रकार पाहायला मिळाला. वर्षाअखरेच्या सेलिब्रेशनची धुंद मद्यधुंद तरुणीच्या डोक्यातून जायला मागत नव्हती. नशेतच तिने गोंधळ घालायला सुरुवात केली. वानवडीतील ऑक्सफर्ड कंफोर्ट सोसायटीत 31 डिसेंबरच्या रात्री हा प्रकार घडत होता. यामुळे सोसायटीतील इतर नागरिक अक्षरश: हैराण झाले होते.
मद्यधुंद तरुणीने दारुच्या गोंधळ घालायला सुरुवात केली. नशेत असलेल्या तरुणीनं आधी सोसायटीचं गेट बंद केलं आणि अर्वाच्च भाषेत तोंडाला येईल ते बोलायला सुरुवात केली. प्रकरण सहन होण्याच्या पलीकडे गेल्याने सोसायटीतील रहिवाश्यांनी तातडीनं पोलिसांना बोलावलं.
पोलीस सोसायटीत दाखल झाले. त्यात महिला पोलीसही होत्या. त्यांनी मुलीला समजावण्याचा प्रयत्न केला. पण तरुणी समजण्यापलीकडच्या अवस्थेत गेली होती. दारुच्या नशेत या तरुणीनं महिला पोलिसांना देखील मारहाण केल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात.
तसेच तिने सोसायटीच्या मालमत्तेचीही तोडफोड केल्याचा आरोप रहिवाश्यांनी केलाय. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत तिला ताब्यात घेतलं.
या मुलीवर कारवाई होईल त्यामुळे पुढे ती अशा गोष्टी करण्यास धजावरणार नाही अशा सोसायटीकरांना होती. पण नेमकं याच्या उलट झालं. ही तरुणी एका बड्या पोलीस अधिकाऱ्याची मुलगी असल्याच सांगण्यात येत आहे. याच कारणामुळे तिला लगेच सोडून देण्यात आल्याचं सोसायटीतील रहिवाशांनी म्हटलंय. आता ही घटना माध्यमांसमोर आली आहे. यानंतरही पोलीस प्रशासन जाग होणार आहे का? आरोपीला शिक्षा करणार का? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.