Mumbai News Update: मोठ्या उत्साहात नववर्षाचे स्वागत करण्यात आले आहे. सरत्या वर्षाला निरोप देत आणि नववर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी मुंबईत कार्यक्रम आखण्यात आले होते. तर, मुंबईकरही मोठ्या उत्साहात नववर्ष साजरे केले. 2024 या नव वर्षात मुंबईकरांची वाहतुक कोंडीतून सुटका होणार आहे. मुंबईत सुरु असणारे महत्त्वकांक्षी प्रकल्प या वर्षाअखेरीस नागरिकांच्या सेवेत येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर, अन्य प्रकल्पाची कामही वेगाने पुढे जाण्याची शक्यता आहे.
मुंबईकरांचा प्रवास सुखकर होण्यासाठी आणि वाहतुक कोंडीतून सुटका करण्यासाठी महानगरपालिका आणि प्रशासनाकडून जोमाने प्रयत्न करण्यात येत आहेय या नव्या वर्षात अनेक प्रकल्प खुले होणार आहेत. त्यातीलच एक म्हणजे, सागरी किनारा मार्गाचा (कोस्टल रोड) पहिला टप्पा खुला होणार आहे. वरळी सीफेस ते मरिन ड्राइव्हदरम्यानच्या मार्गिका या टप्प्यात खुल्या करण्यात येणार आहेत. या फेब्रुवारी 2024 पर्यंत या मार्गिका प्रवाशांचा सेवेत दाखल करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असणार आहे. या मार्गिकेमुळं मरीन ड्राइव्ह ते वांद्रे वरळी सी लिंक चा अर्धा ते पाऊण तासांचा प्रवास दहा मिनिटांवर येणार आहे.
एमएमआरडीएकडून शिवडी-न्हावाशेवा अटलबिहारी वाजपेयी सागरी सेतू (MTHL) हा बहुचर्चित पुल येत्या 12 जानेवारी 2024 रोजी प्रवाशांसाठी खुला होणार आहे. या पुलामुळं मुंबई ते नवी मुंबई अंतर 20 ते 25 मिनिटांत पूर्ण होणार आहे. शिवडी ते चिर्ले असा हा 21 किमी लांबीचा मार्ग आहे. या पुलाचा 16 किमीचा भाग समुद्रावर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुलाचे लोकार्पण होण्याची माहिती समोर येतेय.
अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणारा गोखले उड्डाणपुलाचा पहिला टप्पा 15 फेब्रुवारी 2024 नंतर सुरू होण्याची दाट शक्यता आहे. हा उड्डाणपुल सुरू झाल्यामुळं अंधेरी ते विलेपार्ले येथील वाहतुक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
मुंबई शहरात मोठ्या क्षमतेने मेट्रोचे जाळे विस्तारत आहे. मेट्रो 3 या भूमिगत मेट्रो मार्गिकेचा पहिला टप्पा एप्रिल 2024मध्ये सुरू होणार आहे. बीकेसी ते आरे पर्यंतचा प्रवास पहिल्या टप्प्यात करता येणार आहे. या मार्गिकेवर दहा स्थानकांचा टप्पा असणार आहे. या मार्गिकेवर प्रत्येकी 8 डब्यांच्या 160 फेऱ्या असणार आहेत.