नारायण राणे यांची पत्नी, मुलगा यांच्या विरोधात लूकआऊट नोटीस; कर्ज थकवल्याने कोर्टाच्या आदेशानंतर कारवाई

 केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या पत्नी नीलम राणे (Neelam Rane)  आणि  नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या विरोधात लूकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आले आहे. 

Updated: Sep 10, 2021, 07:40 AM IST
नारायण राणे यांची पत्नी, मुलगा यांच्या विरोधात लूकआऊट नोटीस; कर्ज थकवल्याने कोर्टाच्या आदेशानंतर कारवाई  title=
संग्रहित छाया

पुणे : Lookout Circular : भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या पत्नी नीलम राणे (Neelam Rane)  आणि पुत्र आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या विरोधात लूकआऊट सर्क्युलर जारी करण्यात आले आहे. DHFL कंपनीचे कर्ज थकवल्याप्रकरणी ही नोटीस बजावण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. (Lookout Circular Given To Rane Family)

DHFL कर्ज प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे तसेच मुलगा आमदार नितेश राणे यांच्यासह 30 जणांच्या विरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने याबाबतचे सर्क्युलर काढले आहे. ( Pune Crime Branch Police Lookout Circular Given To Narayan Rane Family)

राणे यांच्या कंपनीने DHFL कडून कर्ज घेतले होते. ते कर्ज वेळेत फेडले गेले नसल्याबाबतचा वाद न्यायप्रविष्ट आहे. या पार्श्वभूमीवर तक्रार असलेल्या व्यक्ती विदेशात किंवा इतरत्र कुठे जाऊ नयेत यासाठीची खबरदारी घेण्याची विनंती DHFL कडून केंद्र सरकारला करण्यात आली होती. त्यानुसार केंद्राकडून राज्य सरकारला सूचना देण्यात आल्या आहेत. त्या आधारावर राज्यातील विमानतळे तसेच संबंधित अस्थापनांकडे सर्क्युलर (circular) पाठवण्यात आले आहे.

दरम्यान, नीतेश राणे यांनी याबाबत स्पष्टीकरण करताना सांगितले की, पुणे पोलिसांना कारवाई करण्याचा अधिकार आहे का? आमचे बँक खाते मुंबईत आहे. असे असताना पुणे पोलिसांनी लुकआऊट सर्क्युलर पुण्यातून कसे काढले? आम्ही जे कर्ज घेतले त्याची आम्हाला सेटलमेंट करायची आहे, याबाबतचे पत्र पाच महिन्यांपूर्वी कंपनीला दिले आहे. असे असतानाही हे सर्क्युलर कसे काय काढले?