Pune Crime : पुण्यात 10 ते 12 तरुणांनी धुडगूस घातला आहे. परिसरात दहशत राहावी म्हणून तलवारीने 14 गाड्या फोडून नुकसान केले आहे. या हल्ल्यात रिक्षा, दुचाकी, टेम्पो, चारचाकी, दुचाकींचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना पुण्यातील कोंढवा भागातील टिळेकर नगरात घडली असून, या घटनेमुळे नागरिक भयभीत आहेत. हा सगळा प्रकार बुधवारी घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 10 ते 12 हल्लेखोर बुधवारी रात्री 4 दुचाकीवरून आले. त्यांनी त्यांच्या जवळील असलेल्या तलवार आणि इतर हत्याराने परिसरातील अनेक गाड्यांच्या काचा फोडल्या. यात 14 गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काही दिवसांपूर्वी या परिसरात राहणाऱ्या काही तरुणांनी आरोपी यांना शिवीगाळ केली होती. याच गोष्टीचा राग मनात धरून आणि भागात आपले वर्चस्व टिकून राहावे म्हणून हा सगळा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन संशयित आरोपींना अटक केली आहे. तर बाकीच्यांचा शोध सुरु आहे.
पुण्यातील कोंढवा भागातील टिळेकर नगरमधील घटनेमुळे नागरिक भयभीत असून हृषिकेश गोरे (20), सुशील दळवी (20), प्रवीण भोसले (18) अशी हल्ला केलेल्यांची नावे असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी या परिसरात राहणाऱ्या काही तरुणांनी आरोपी यांना शिवीगाळ केली होती. याच गोष्टीचा राग मनात धरून आणि भागात आपले वर्चस्व टिकून राहावे म्हणून हा सगळा प्रकार घडल्याचे समोर येत आहे.
दरम्यान, पुणे शहरात गुन्हेगारी वाढत आहे. कोयता गँग पुन्हा सक्रीय झाली आहे. पुणे पोलिसांनी कोयता गँगची धिंड काढली होती. मात्र, पोलिसांची अद्याप वचक नसल्याचे पुन्हा घडवून आणलेल्या हल्ल्यानंतर दिसून आले आहे. पुन्हा एकदा पूर्ववैमनस्यातून एका टोळीने तरुणावर जीवघेणा हल्ला केला. कोयत्याने तरुणावर वार करुन त्याच्या हाताचा पंजा मनगटापासून छाटला आहे. ही घटना भरदिवसा कात्रज येथे घडली आहे.
याप्रकरणी अभिजीत दुधनीकर (23) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर या तक्रारीच्या आधारे भारती विद्यापीठ पोलिसांनी पाच जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अखिलेश तथा लाडप्पा चंद्रकांत कलशेट्टी या तरुणावर हा हल्ला करण्यात आल्याचे समोर आले आहे. सुदैवाने डॉक्टरांनी तातडीने अखिलेशवर शस्त्रक्रिया करुन त्याचा पंजा पुन्हा जोडला आहे.