चपात्या बनवणारा तो चिमुरडा सापडला!

पुण्यातल्या अंकित वाघ या चिमुकल्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. 

Updated: Jun 29, 2017, 10:21 PM IST
चपात्या बनवणारा तो चिमुरडा सापडला! title=

नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे : पुण्यातल्या अंकित वाघ या चिमुकल्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. अवघ्या साडे चार वर्षांचा हा अंकित एखाद्या सुगरणीला लाजवेल अशा पद्धतीनं पोळ्या लाटतो.

पोळ्या लाटतानाचा चिमुकल्या अंकितचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालाय. पोळी लाटण्याचा अंकितचा वेग आणि अगदी गोल पोळी बनवण्याची त्याची पद्धत कौतुकास्पद आहे.

पोळी लाटण्यात अंकित मास्टर आहेच. पण इतर स्वयंपाक करण्यातही त्याचं एक पाऊल पुढं आहे. भाजी कापून देणं, आमटी बनवण्यासाठी मदत करणं ही कामं देखील अंकित अगदी सहजपणं करतो. त्याला अंड्याचं आम्लेट आणि करंजी देखील बनवता येते. स्वयंपाकाचे हे धडे त्यानं घरातच गिरवलेत.

अंकितला टीव्ही पाहायला अजिबातच आवडत नाही. पण तो चार्ली चॅप्लिनचा जबरदस्त फॅन आहे. त्यामुळं त्याचं टोपण नाव चार्ली ठेवण्यात आलंय. अंकित सध्या जुनिअर केजीमध्ये शिकतोय. त्याचे वडील सॉफ्टवेअर इंजिनिअर, तर आई गृहिणी आहे.

भल्याभल्यांची गोल चपात्या लाटताना अजूनही भंबेरी उडते. पण वयाच्या चौथ्या वर्षीच स्वयंपाक बनवण्यात अंकित मास्टरी मिळवलीय. भविष्यात चांगला कूक होण्याचं करिअर अंकितनं निवडलं तर आश्चर्य वाटायला नको.. कारण बाळाचे हात पोळ्या लाटतायत.