माझा बाप बिल्डर असता तर? पुण्यातील निबंध स्पर्धेचा विषय चर्चेत

पुणे कार अपघात प्रकरणात रोज नव नविन खुलासे होत आहेत. अशातच पुण्यात एका निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  माझा बाप बिल्डर असता तर? असा विषय या निबंध स्पर्धेसाठी देण्यात आला आहे. 

वनिता कांबळे | Updated: May 25, 2024, 07:24 PM IST
माझा बाप बिल्डर असता तर? पुण्यातील निबंध स्पर्धेचा विषय चर्चेत  title=

Pune Car Accident : पुण्याच्या कल्याणनगरमधील धक्कादायक अपघातानं राज्यभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मद्यधुंद अवस्थेतील एका अल्पवयीन आरोपीनं कारनं दोघांना चिरडल्यानं तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू झाला. मात्र, अवघ्या 17 तासांच्या आत न्यायालयानं आरोपीला जामीन मंजूर केला. पुण्यातील नामांकित बिल्डरचा मुलगा असलेल्या या आरोपीला जामीन देताना न्यायालयानं घातलेल्या अटींमध्ये त्याला   रस्ते अपघात आणि त्यावरील उपाय याबाबत 300 शब्दांचा निबंध लिहायला सांगितला. निबंध लिहीण्याच्या अटीवरुन चांगलाच वाद पेटला आहे. अशातच आता पुण्यात एका निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. माझा बाप बिल्डर असता तर?  असा विषय या निबंध स्पर्धेत देण्यात आला आहे. विजेत्याला बक्षिसही मोठ्या रकमेचे दिले जाणार आहे. यामुळे ही निबंध स्पर्धा चांगलीच चर्तेच आलेय. 

माझा बाप बिल्डर असता तर? पुण्यातील निबंध स्पर्धेचा विषय

पुण्यातील कार अपघात प्रकरणानंतर   पुणे युवक काँग्रेसने भव्य राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले आहे.   माझी आवडती कार ( पॉर्शे , फरारी , मर्सिडीज,),  दारूचे दुष्परिणाम. माझा बाप बिल्डर असता तर? मी खरच पोलीस अधिकारी झालो तर? अश्विनी आणि अनिशचे मारेकरी कोण? असे या निबंध स्पर्धेचे विषय आहेत. या स्पर्धेतील विजेत्याला 11 हजार 111 रुपयांचे पहिल बक्षीस दिले जाणार आहे.  आमदार रविंद्र ढंगेकरांच्या हस्ते बक्षीस वितरण होणार आहे.  8 ते 58 अशी या स्पर्धेची वयोमार्यदा आहे.  26 मे, रविवारी सकाळी अपघात स्थळी म्हणजेच बॉलर पब समोर कल्याणीनगर येथे ही अनोखी निबंध स्पर्धा पार पडणार आहे. 

नेमका अपघात कसा झाला?

पुण्याच्या कल्याणीनगरमधील अपघातानं सपूर्ण राज्य हादरलंय. मद्यपान करून बेदरकारपणे आलिशान पोर्शे कार चालवणा-या अल्पवयीन तरुणानं बाईकला धडक दिली. ही धडक एवढी मोठी होती की, अश्विनी कोष्टा आणि अनिस अहुदिया या दोघांचा जागीच मृत्यू झाला.  पुणे हिट अँड रन प्रकरणी राहुल गांधींनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.  सामान्य चालकानं उडवलं तर 10 वर्षांची शिक्षा दिली जाते. मात्र श्रीमंत घरातील मुलगा जबाबदार असेल, तर त्याला निबंध लेखन सांगितलं जातं. अशा शब्दांत राहुल गांधींनी व्हिडिओद्वारे सडकून टीका केली आहे.