पुणे : आपल्या आजूबाजूला नेमकं काय घडतंय आणि आपला कोणी गैरफायदा घेत नाही ना यासाठी कायम सतर्क राहाणं गरजेचं असतं. आपली एक चुक आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. कनिष्ठ पदावर असलेल्या तरुणीसोबत असाच एक प्रकार घडला ज्याचे धक्कादायक परिणाम तिला सोसावे लागले.
कंपनीत आपल्या वरिष्ठ पदाचा वापर करून तरुणीला त्रास दिल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आधी पदाचा फायदा घेऊन कनिष्ठ पदावरील तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. तू माझ्याशी लग्न कर मी माझ्या पत्नीला घटस्फोट देतो असं खोटं आश्वासनही दिलं.
तरुणी त्याच्या आमिषाला बळी पडली आणि वरिष्ठ अधिकाऱ्याने वारंवार तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. आपल्या सहकाऱ्याच्या मदतीनं तिची कंपनीत बदनामी केली. या प्रकरणी पोलिसात बोलली तर घरच्यांचा अपघात घडवीन अशी धमकी तिला देण्यात आली.
तरुणीनं अखेर हिंमत करून या प्रकरणी हडपसर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी राहुलकुमार सिंग, मालव आचर्य या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. तरुणीनं पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीनं फोनवर संपर्क केला. हळूहळू हा संपर्क वाढवला आणि प्रेमाच्या जाळ्यात ओढलं.
पत्नीला घटस्फोट देऊन तुझ्याशी लग्न करीन असं आमिष दाखवलं. लग्नाचं आमिष दाखवून पीडित तरुणीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. तिची कंपनीतही बदनामी केली. पीडित महिलेनं मानसिक छळ केल्याचाही आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे.