प्रफुल्ल पवार / रायगड : shooting case : प्रेमात अडसर ठरणार्या प्रेयसीच्या भावावर गोळीबारकरण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. जिल्ह्यातील माणगावातील गुन्हयाचा छडा लागल्यानंतर ही माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. तर एकाचा शोध सुरू आहे.
मागील महिन्यात माणगाव येथील मेडिकल दुकानदारावर झालेला गोळीबार (Mangaon shooting case) प्रेमप्रकरणातून झाल्याचे तपासात समोर आले आहे. (Shooting at the brother of a lover who is an obstacle in love) प्रेयसीचा भाऊ प्रेमात अडसर ठरतो म्हणून त्याचा काटा काढण्यासाठी सुपारी देऊन त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. यात मुख्य आरोपी सह चार जणांना अटक करण्यात पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. तर त्यांच्या एका साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे.
मयूर सुरेश गवळी (21, शीळफाटा, मुंब्रा), अजय महादेव अवचार (20, नौसिल नाका रबाळे), राजेश विजय शेळके(22, नोसिल नाका रबाळे), नितीन शिरमाजी कांबळे (24, नोसिल नाका रबाळे) नवी मुंबई अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचा एक साथीदार फरार आहे. दरम्यान मयूर सुरेश गवळी हा यातील प्रमुख आरोपी आहे. हे सर्व मूळचे परभणीचे रहिवाशी आहेत.
मयुर गवळी याने ज्याच्यावर गोळीबार केला, त्याच्या बहिणीशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली. त्यातून त्यांचे प्रेम जमले. परंतु या प्रेमात तिचा भाऊ हा अडसर ठरत होता. भावाने बहिणीचा फोन काढून घेतला होता. त्यामुळे त्याचा काटा काढण्याचा निर्णय मयुरने घेतला. तसेच आरोपी मयुरने 80 हजार रुपयांची सुपारी दिली होती.
12 फेब्रुवारी 2022 रोजी रात्री शुभम हा मेडिकल दुकान बंद करून घरी जात असताना काळ्या रंगांच्या पल्सर मोटरसायकलवरून आलेल्या दोघांनी शुभम याच्या पोटात पिस्तुलातून गोळी झाडली. दैवबलवत्तर म्हणून जीवघेणा हल्ला करून आरोपी फरार झाले. शुभम हे यात गंभीर जखमी झाले होते. पोलिसांच्या सतर्कतेमुळे शुभमला वेळीच रूग्णालयात दाखल करण्यात आल्याने त्यांचा जीव वाचला.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे ,पोलीस उपनिरीक्षक डोंबाळे, पोलीस उपनिरीक्षक महेश कदम आणि त्यांच्या पथकाने पोलीस अधीक्षक अशोक दुधे ,यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. प्राथमिक माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजची या तपासात खूपच मदत झाल्याचे या वेळी अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले.
शुभम याच्यावर झालेल्या गोळीबाराचा तपास सुरु असताना एकेदिवशी जखमी शुभम यांचे वडील यांना फोन करुन अज्ञाताने दोन दिवसात 2 कोटी रुपये देण्याची मागणी केली. नाहीतर तुझ्या परिवारास मुलाप्रमाणे ठार मारु अशी धमकी दिली. आरोपीच्या धमकी कॉलचा तपास घेत असताना पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले. त्यांचा एक साथीदार फरार आहे.
या तपासात सहाय्यक फौजदार गिरी, पोलीस हवालदार दीपक मोरे, सुधीर मोरे, अमोल हांबीर, प्रतिक सावंत, जितेंद्र चव्हाण, पोलीस नाईक इश्वर लांबाटे, अक्षय सावंत, देवराम कोरम, सायबर सेलचे अक्षय पाटील, तुषार घरत यांची देखील पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांना मोलाची साथ मिळाली.