पुणे : बार हा शब्द ऐकला की डोळ्यासमोर बिअर बार, दारूचा बार, हुक्का बार हे प्रकार उभे राहतात. पण पुण्यात एक जीवनावश्यक बार निघालाय. काय आम्ही तुम्हाला सांगतोय तो आहे ऑक्सिजन बार. प्राणवायू पुरवणारा बार. इथे शुद्ध प्राणवायु मिळेल तोही विविध फ्लेवरमध्ये. श्वासोत्सवासास त्रास असलेल्यांना डोळ्यासमोर ठेऊन या बारची निर्मिती करण्यात आलीय. मात्र सर्वसामान्यांनाही याचे अनेक फायदे आहेत.
वातावरणात 21 टक्के ऑक्सिजन आहे. मात्र त्यात अशुद्धता वाढत चाललीय. ऑक्सिजन बारमध्ये हवेतील शुद्ध ऑक्सिज कॉन्सट्रेटरच्या मदतीने वेगळा काढला जातो. वॉटर बेस अरोमाजच्या माध्यमातून तो इथे दिला जातो. 10 ते 40 मिनिटांपर्यंत तुम्ही हा ऑक्सिजन तुम्हाला हव्या त्या फ्लेवरमध्ये घेऊ शकता. झोप शांत लागणं, ताप कमी येणं, रक्तदाब दूर होणं, रोगप्रतिकारक शक्ती वाढणं, त्वचा आणि केसांच्या तक्रारी दूर होणं असे अनेक फायदे या ऑक्सिजन बारमुळे होतील असं सांगितलं जातंय.
वाढलेलं प्रदूषण, बदललेलं हवामान, विविध ठिकाणी सुरू असलेलं काँक्रिटीकरण यामुळे पुण्यातील हवा दिवसेंदिवस प्रदूषित होतेय. केवळ पुण्यातली नाही तर प्रत्येक शहरात हीच स्थिती आहे. त्यामुळे प्रकृती उत्तम ठेवण्यासाठी पुणेकरांना चांगली मोकळी हवा मिळण्यासाठीही प्रयत्न व्हायला हवेत. सुंदर झाडं लावली. बागा निर्माण केल्या. वाहनांची संख्या घटली तर अशा ऑक्सिजन बारचा आधार घ्यावा लागणार नाही.