Maharashtra Rain News : राज्यात मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागली आहे. मात्र, त्याआधीच राज्यात मान्सूनपूर्व पावसाने गोंधळ घातला आहे. रविवारी राज्यभरात अेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला आहे. या पावसामुळे दुर्घटना होऊन राज्यभरात चार ते पाच जणांचा मृत्यू झाला आहे. वाशिममध्ये वीज कोसळून दोन शेतकऱ्यांचा मृत्यू आहे. तर, रायग आणि नंदुरबारमध्ये झाड पडून दोघांनी आपले प्राण गमावले आहेत.
वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पडलेल्या मान्सून पूर्व पावसाने धुमाकूळ घातला आहे. विज पडून दोन शेतकऱ्यांचा तर 3 गायी आणि दोन म्हशींचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भर जहांगीर शिवारात शेतात काम करणाऱ्या संदीप काळदाते या शेतकऱ्यावर वीज पडल्याने ते जागीच ठार झाले आहेत. तर, मुसळवाडी शिवारात झाडावरील आंबे उतरवताना अंगावर वीज पडल्याने नारायण कदम यांचा मृत्यू झाला आहे. तर, त्यांचे वडील गोविंदा कदम हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर, रिसोड तालुक्यातील कोयाळी जाधव परिसरात वीज कोसळून भागवत कांबळे यांच्या दोन गाईचा आणि नंधाना परिसरातील पांडुरंग टाले यांच्या एका गायीचा व म्हशीचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वीज पडून पाळीव गुरे ठार झाल्याने शेतकऱ्यांच मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.
रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात दुपारी वादळी वाऱ्यासह पावसाने जिल्ह्यात पहिला बळी घेतला आहे. मासेमारी करत असताना अंगावर झाड पडून एकाचा मृत्यू झाला. भगवान जाधव असे मृत व्यक्तीचे नाव आहे . तर वासरंग इथं अंगावर झाड कोसळल्याने एक व्यक्ती गंभीर जखमी झाली. त्याला एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात वादळी-वा-यामुळे चालत्या कारवर एक झाड कोसळलं. त्यामुळे एकाचा मृत्यू झालाय तर दोन जण जखमी झाले आहेत. झाडाखालून जात असलेल्या एर्टिगा गाडीवर हे झाड कोसळलं त्यात राजेंद्र मराठेंचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत. स्थानिकांच्या मदतीनं हे झाड बाजुला करण्यात आलं.