मोठी बातमी! शरद पवारांच्या विश्वासू सहकाऱ्याचं प्रयागराजमधील कुंभमेळ्यात हार्ट अटॅकने निधन

Prayagraj Kumbh Mela 2025 Maharashtra Leader Death: आज प्रयागराजमधील महाकुंभचा दुसरा दिवस असून इथून महाराष्ट्राला हादरवून सोडणारी बातमी समोर आली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 14, 2025, 12:06 PM IST
मोठी बातमी! शरद पवारांच्या विश्वासू सहकाऱ्याचं प्रयागराजमधील कुंभमेळ्यात हार्ट अटॅकने निधन title=
त्यांनी नुकतीच विधानसभा निवडणूक लढवली होती (फाइल फोटो)

Prayagraj Kumbh Mela 2025 Maharashtra Leader Death: उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे कुंभमेळ्याचा आज दुसरा दिवस आहे. आजच्या दिवशी पवित्र स्थानासाठी येथे कोट्यवधी भाविकांनी गर्दी केलेली असतानाच महाराष्ट्रातील एका नेत्याचं प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. शरद पवारांच्या पक्षाचे नेते आणि सोलापूरचे माजी महापौर महेश कोठेंचं निधन झालं आहे. महेश कोठे हे 55 वर्षांचे होते. महेश कोठेंचा मृतदेह प्रयागराज येथून सोलापुरात विमानाने आणण्यात येणार आहे.

पवारांच्या विश्वासातील नेता

महेश कोठे हे प्रयागराज येथे कुंभमेळासाठी गेले असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. शरद पवार यांच्या विश्वासातील नेते म्हणून महेश कोठे यांची ओळख होती. सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ राजकीय नेता हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

वेवेगळ्या पक्षांमधून राजकारण

महेश कोठे यांनी नुकतीच पार पडलेली विधानसभा निवडणूक सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून लढवली होती. मात्र, त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. महेश कोठे यांचे सोलापूर शहराच्या राजकारणातील मोठं नाव होतं. सोलापूर महापालिकेच सर्वात तरुण महापौर अशी त्यांची ओळख होती. शिवसेना सोडून राष्ट्रवादीमध्ये जाण्यापूर्वी ते सोलापूर महापालिकेचे विरोधी पक्षनेते देखील होते. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार गट अशा विविध पक्षांच्या माध्यमातून कोठेंनी आपला राजकीय प्रवास केला. 

महापालिकेमध्ये वर्चस्व राहिलं

महेश कोठे यांनी 2021 मध्ये शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यरत होते. राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यानंतर महेश कोठे शरद पवारांसोबत एकनिष्ठ राहिले. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, सोलापूर उत्तर मतदारसंघातून महेश कोठे हे विजय देशमुख यांच्याकडून पराभूत झाले. महेश कोठे यांनी चार ते पाचवेळा विधानसभा निवडणूक लढवली पण त्यांना अपयश आलं होतं. मात्र, सोलापूर महापालिकेच्या राजकारणात त्यांचं वर्चस्व होतं. महेश कोठे यांचे 14-15 नगरसेवक सोलापूरमध्ये निवडून यायचे. महेश कोठे यांचे पुतणे देवेंद्र कोठे हे विद्यमान आमदार आहेत. 

समाजकारणातही सक्रीय

सोलापूर महापालिकेचे महापौर, विरोधी पक्ष नेते, सभागृह नेते अशा विविध जबाबदारी महेश कोठे यांनी पार पडल्या आहेत. सोलापूरमधील राजकारणाबरोबर आणि समाजकारणातील मोठं नाव म्हणून महेश कोठे यांनी सोलापूर आणि आजूबाजूच्या परिसरात ओळख होती.