लॉकडाऊनविरुद्ध प्रकाश आंबेडकर रस्त्यावर, सरकारला १५ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन

'सक्तीचे लॉकडाऊन त्वरित उठवून लोकांना त्यांचा निर्णय घेऊ द्यावा'

Updated: Aug 12, 2020, 08:41 PM IST
लॉकडाऊनविरुद्ध प्रकाश आंबेडकर रस्त्यावर, सरकारला १५ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन title=

नागपूर : नागपूरमध्ये बुधवारी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि वंचितच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनलॉक काळात दुकानांसाठीचा सम-विषम फॉर्म्युला बंद करुन, आता सर्व दिवशी दुकानं सुरु करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. 

आंतर राज्य आणि जिल्हात प्रवास सुरु करावा. सार्वजनिक वाहतूक सुरु करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. खासगी वाहतुकीसाठी परवानगी देतात, परंतु त्यांच्याकडून प्रवाशांची लूट करण्यात येते. एसटी सुरु असती तर ही लूट झाली नसती, असंही यावेळी ते म्हणाले.

'नागपूरमध्ये लॉकडाऊनविरोधात आंदोलनासाठी आलोय. सार्वजनिक वाहतूक, लहान दुकाने वगैरे बंद ठेवण्याचं काहीच कारण नाही. लोकशाहीमध्ये जनता मालक असते, सरकारने मालक होण्याचा प्रयत्न करु नये. सक्तीचे लॉकडाऊन त्वरित उठवून लोकांना त्यांचा निर्णय घेऊ द्यावा', अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला इशारा दिला आहे.

सरकार १५ ऑगस्टपर्यंत सार्वजनिक वाहतूक, आंतर जिल्हा वाहतूक, सुरु करणार नसेल तर आम्ही हे बंधन मोडू, असा इशारा देत प्रकाश आंबेडकर यांनी सरकारला १५ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन दिली आहे.