Kapil Patil : अकोल्यातली लढत यंदा महाराष्ट्रात लक्षवेधी ठरणाराय.. भाजप विरुद्ध काँग्रेस विरुद्ध वंचित बहुजन आघाडी असा तिरंगी सामना इथं रंगणार आहे. यंदा प्रकृतीच्या कारणास्तव संजय धोत्रेंनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. आता त्यांचा मुलगा अनुप धोत्रे यांना भाजपनं उमेदवारी दिलीय.. साधी ग्रामपंचायतीची निवडणुकही कधी न लढलेल्या अनुप यांना थेट लोकसभेचं तिकीट दिल्यानं भाजपमध्येच नाराजी उफाळून आलीय. भाजपचे बाळापूरचे माजी आमदार नारायण गव्हाणकर यांनी घराणेशाहीला विरोध करत उमेदवारी अर्ज भरल्यानं भाजपची डोकेदुखी वाढलीय. गेल्यावेळी दुस-या क्रमांकांची मतं घेणारे प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पुन्हा एकदा अकोल्याच्या रणमैदानात उतरलेत. काँग्रेस त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा देईल, अशी अपेक्षा होती. मात्र त्यांना मविआत घेण्याचे प्रयत्न फोल ठरले आणि डॉ. अभय पाटील यांच्या रुपानं काँग्रेसनं मराठा उमेदवाराला तिकीट दिलं. अशातच आमदार कपिल पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा मिळावा यासाठी शरद पवार यांना पत्र लिहीले आहे.
आदरणीय श्री. शरद पवार साहेब
सप्रेम नमस्कार,
महाराष्ट्र हा फुले - शाहू - आंबेडकर विचारधारेवर उभा आहे. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य चळवळीत सर्वाधिक योगदान महाराष्ट्रानेच दिलं. छत्रपती शिवरायांचा वारसा असलेला महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापुढे कधी झुकला नाही.
नथुरामी फॅसिस्ट शक्तींच्या विरोधात तुम्ही महाराष्ट्रात महाविकास आघाडी उभी केली. म्हणूनच समाजवादी गणराज्य पार्टी आणि राज्यातील सर्व डाव्या पुरोगामी शक्ती तुमच्या सोबत आहेत.
तथापी या आघाडीत नथुरामी फॅसिझमच्या विरोधात सातत्याने सर्वात प्रखर भूमिका घेणारे अॅड. प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी यांना सामावून घेण्यात आपल्या सर्वांना अपयश आले. त्यांची सल आपल्याही मनात असेल.
प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी यांना महाविकास आघाडीत सामावून घेता आले नाही म्हणून त्यांना भाजपची बी टीम म्हणून हिणवले जात आहे, अपमानित केले जात आहे. हे कमी की काय म्हणून आता महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवाच्या आणि वंचित बहुजन आघाडीच्या विरोधी प्रचारात उतरवण्यात आले आहे. हे खरोखरच दुर्मानवी आहे. दुर्दैवी नव्हे दुर्मानवी यासाठी की बाबासाहेबांचा दैवावर विश्वास नव्हता. आणि सश्रद्ध माणसं मानवी चुकांसाठी दैवाला दोष देत नाहीत. ऐतिहासिक जखमांचं ज्यांना भान आहे, त्यांनी त्यावरची खपली का काढावी हे समजत नाही.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे पणतू शाहू छत्रपती महाराज यांना कोल्हापूर लोकसभेत उमेदवारी देण्यासाठी आपण पुढाकार घेतला. ही आशा आणि विश्वास निर्माण करणारी घटना आहे. फुले - शाहू - आंबेडकरांचा महाराष्ट्र फॅसिस्ट जातीयवादी शक्तींना साथ देत नाही. हे आपण दाखवून दिलं आहे. त्याच भूमिकेतून खुद्द प्रकाश आंबेडकर यांनी शाहू छत्रपती यांना पाठिंबा जाहीर केला आहे. बारामतीत सुप्रियाताई सुळे यांच्या विरोधात सुद्धा उमेदवार त्यांनी दिलेला नाही. मात्र डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे खरे वारस प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात कॉँग्रेसचा उमेदवार देऊन आपण मोठी चूक करत आहोत.
अकोल्यात काँग्रेसचे उमेदवार डॉ. अभय पाटील यांचे वडील संघ - भाजपचे होते म्हणून आक्षेप घेण्याचे कारण नाही. पण डॉ. अभय पाटील हे सुद्धा त्याच विचारांचे समर्थक आहेत. बाबरी मशीद पाडण्याचं आणि मुस्लिम विरोधी नफरतीचं ते आजही समर्थन करतात, तरीही ते आघाडीचे उमेदवार आहेत, हे धक्कादायक आहे.
उद्या, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीचा पाठिंबा जाहीर करावा, ही आग्रहाची विनंती.
आदरणीय उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे नेते आहेत आणि आपण पालक आहात, त्यामुळे आपण दोघांनी पुढाकार घेणं आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न न देणं, संसद भवनात फोटोही न लावणं, मंडल आयोग दडपून ठेवणं अशा काँग्रेसच्या ऐतिहासिक चुकांचं पापक्षालन करण्याची याशिवाय दुसरी वेळ नाही. धन्यवाद!
आपला स्नेहांकित,
कपिल पाटील
अध्यक्ष, समाजवादी गणराज्य पार्टी
13 एप्रिल 2024