शासनाच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्र बंद - प्रकाश आंबेडकर

भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारावर राज्यभरात पडसाद उमटत असून याचदरम्यान भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. 

Updated: Jan 2, 2018, 04:00 PM IST
शासनाच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्र बंद - प्रकाश आंबेडकर title=

मुंबई : भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचारावर राज्यभरात पडसाद उमटत असून याचदरम्यान भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उद्या महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली. शासनाच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्र बंद करण्याचे मी जाहीर करतो, असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाला विरोध केला होता

यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘संभाजी ब्रिगेडच्या विनंतीवरून मी ही पत्रकार परिषद घेत आहे. अखिल भारतीय ब्राह्मण सभा, समस्त हिंदु आघाडी आणि पेशव्यांच्या वारसांनी याला विरोध दर्शविला भीमा कोरेगाव येथील कार्यक्रमाला विरोध केला होता. अखिल भारतीय हिंदु महासभेबरोबर आम्ही कार्यक्रमापूर्वी चर्चा केली, त्यांचा विरोध मावळला होता. गोविंद गायकवाड यांची समाधी उध्वस्त करणार्‍यांम़ध्ये ४९ आरोपी असून ९ जणांना अटक झाली आहे.

पोलिसांनी परवानगी नाकारली

१ तारखेला वडगाव बुद्रुक येथे १५०० लोक एकत्र करण्यात आली होती. याला पोलिसांनी परवानगी नाकारली होती, मात्र नंतर काळा दिवस साजरा करण्यास पोलीसांनी परवानगी दिली होती. याला गावातील लोकांचा विरोध झाला, मग याच लोकांनी कोरेगाव स्तंभाकडे येणा-यांवर दगडफेक केली. अशी परिस्थिती हाताळेल असे कोणीही अधिकारी नव्हते. मी २ वाजता मुख्यमंत्री आणि गृहराज्यमंत्री यांना फोन केला, त्यांना या घटनेची कल्पनाच नव्हती. पोलीसांनी यात हलगर्जीपणा केलाय. 

गच्चीवरून दगडफेक

स्तंभाकडे येताना लागणार्‍या गावातील घरांच्या गच्चीवर दगड ठेवलेले होते. तिथून दगडफेक करण्यात आली. शिवराज प्रतिष्ठान आणि हिंदु एकता आघाडी यांनी स्वतच्या कार्यकर्त्यांना दगडफेक करायला लावली आणि गाड्या जाळल्या. कोरेगाव पासून शिरुर आणि कोरेगाव आणि चाकणपर्यंच्या गावाचे अनुदान बंद करण्यात यावे. आजही चाकण शिक्रापूर रस्त्यावर अनेक गावातील लोकांनी यांना आश्रय दिला आहे. याचे सूत्रधार आहेत संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे आणि तिसरे सूत्रधार मांजरीतील घुगे आहेत, यांचा सरकारने बंदोबस्त करावा.

शांतता राखावी

शांतता नांदली पाहिजे. राग आहे पण सामान्य लोकांना त्रास होऊ नये. लोकांनी आंदोलन करत असतील तर ते थांबवावे. मुख्यमंत्र्यांनी शोध मोहीम थांबवावी अन्यथा स्थिती हाताबाहेर जाईल. शासनाच्या निषेधार्थ उद्या महाराष्ट्र बंद करण्याचे मी जाहीर करतो. ही बंदची हाक महाराष्ट्र लोकशाही आघाडी, महाराष्ट्र डावी आघाडी आणि २५० संघटना मिळून जे फ्रंट तयार झाले होते त्यांनी दिली आहे. हे आव्हान आम्ही कोणाला देत नाही, त्यामुळे प्रतिआव्हान कुणी देऊ नये.