महिनाभर मेगाब्लॉक : प्रगती एक्सप्रेस, कोयना एक्स्प्रेस ३० नोव्हेंबरपर्यंत रद्द

मध्य रेल्वेच्या मंकी हिल ते कर्जतदरम्यान तांत्रिक कामांसाठी आणखी महिनाभर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.  

Updated: Oct 31, 2019, 11:09 AM IST
महिनाभर मेगाब्लॉक : प्रगती एक्सप्रेस, कोयना एक्स्प्रेस ३० नोव्हेंबरपर्यंत रद्द title=
संग्रहित छाया

मुंबई : मध्य रेल्वेच्या मंकी हिल ते कर्जतदरम्यान तांत्रिक कामांसाठी आणखी महिनाभर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे तब्बल २२ एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. ब्लॉक घेण्यात येत असल्यामुळे मुंबई-पुणे मार्गावरील प्रगती एक्सप्रेस रद्द करण्यात आलीय. तर मुंबई-कोल्हापूर-कोयना एक्सप्रेस पुण्यापर्यंतच धावणार आहेत. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीत बाहेरगावी गेलेल्या प्रवाशांना परतीचा प्रवासात अडचणींचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे. 

महिनाराच्या ब्लॉकमुळे  मुंबई ते पुणे प्रगती एक्स्प्रेस, मुंबई-पंढरपूर-मुंबई एक्स्प्रेस, मुंबई-विजापूर-मुंबई, पनवेल-नांदेड-पनवेल साप्ताहिक, पनवेल-पुणे-पनवेल पॅसेंजर या एक्स्प्रेस रेल्वे गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. याशिवाय, मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस, मुंबई-हैदराबाद-मुंबई हुसैनसागर एक्स्प्रेस, एलटीटी-विशाखापट्टनम-एलटीटी, एलटीटी-हुबली-एलटीटी, पनवेल-नांदेड-पनवेल या एक्स्प्रेस ३१ नोव्हेंबरपर्यंत पुण्यापर्यंतच चालविण्यात येणार आहेत.

मंकी हिल ते कर्जत दरम्यान कर्जत दिशेकडील मार्गावर तांत्रिक कामासाठी २२ ऑक्टोबरपासून ते १ नोव्हेंबरपर्यंत ब्लॉक घेतला होता. मात्र या कालावधीत या मार्गावरील तांत्रिक बाबीची पूर्तता होणार नसल्याने मध्य रेल्वे प्रशासनाने नोव्हेंबरचा संपूर्ण महिना ब्लॉक घेण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.