कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : ठाण्यातल्या औद्योगिक क्षेत्रातलं उत्पादन सध्या घटलं आहे. मंदी हे कारण आहेच, पण आणखी एका कारणामुळे ठाण्यातल्या उद्योगांना फटका बसतो आहे. आधीच मंदी, त्यात खड्ड्यांची गर्दी यामुळे याचा परिणाम आता विविध क्षेत्रांवरही पाहायला मिळत आहे.
ठाणे जिल्र्ह्यातल्या वागळे इस्टेट, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली आणि भिवंडीमधल्या औद्योगिक वसाहतींमधल्या कंपन्यांच्या उत्पादनात दोन महिन्यांपासून ३० ते ४० टक्क्यांची घट झाली आहे. मंदी हे त्याचं प्रमुख कारण आहेच. पण या भागातल्या रस्त्यांवरचे खड्डेही त्याला जबाबदार आहेत.
ठाण्यातल्या खड्ड्यांना आणि वाहतूक कोंडीला वैतागून गुंतवणूकदार इथे येतच नाहीत. तसंच औद्योगिक वसाहतींमधून तयार झालेला माल जेएनपीटीच्या दिशेने नेण्यासाठी वाहनचालकांकडून अवाच्या सवा भाडं मागतात.
रोजगार हिरावून नेण्यासाठी खड्डे कारणीभूत ठरतायत, हे गंभीर आहे. ठाण्यातल्या तमाम लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनानं या खड्ड्यांकडे वेळीच लक्ष द्यायला हवं.