दप्तर भरलं? डबा घेतला? आजपासून राज्यातील शाळा आणि पालकांची कसरत सुरु

School Reopening : महिन्या दीड महिन्याच्या सुट्टीनंतर दप्तर, वह्यापुस्तकं आणि शाळेचा गणवेश पुन्हा बाहेर आलाय. आज नव्यानं मित्र भेटतील आणि जुन्यांसोबत पुन्हा गप्पा रंगतील.   

सायली पाटील | Updated: Jun 15, 2023, 08:29 AM IST
दप्तर भरलं? डबा घेतला? आजपासून राज्यातील शाळा आणि पालकांची कसरत सुरु  title=
Post summer vacation Maharashtra state board school to re open from 15 june

School Reopening : राज्यातील बऱ्याच शाळांना एप्रिल महिन्याच्या मध्यमापासून उन्हाळी सुट्टी लागली होती. या सुट्टीच्या निमित्तानं अनेक बाळगोपाळांनी तडक गावची वाट धरली, कोणी नातेवाईकांकडे गेलं, तर कोणी ऊन्हाळी शिबिरांमध्ये जाऊन काहीतरी नवं शिकलं. तर, कोणी मात्र या सुट्टीच्या दिवसांमध्ये फक्त आराम आणि कल्ला केला. आता मात्र या सर्व मंडळींचं हे वेळापत्रक बदलणार आहे. कारण, गुरुवार (15 जून 2023) पासून नव्या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या शाळा पुन्हा सुरु होत आहे, किंबहुना काही शाळा सुरुही झाल्या आहेत. 

विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा तयार 

इथं नव्या दप्तरापासून नव्या गणवेशापर्यंतची तयारी विद्यार्थ्यांनी केली असतानाच तिथं शाळांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्गही नव्या शैक्षणिक वर्षासाठी आणि विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी तयार झाला आहे. 

दरम्यान शाळांच्या पहिल्या  दिवसाच्या निमित्तानं राज्य शासनाच्या वतीनं शाळांमध्ये प्रवेशोत्सवही राबवण्यात येणार आहे. जिथं इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं देण्यात येणार आहेत. 2023 - 24 या आर्थिक वर्षासाठी राज्याच्या शिक्षण विभागाकडून शाळांनाही काही सुचना करण्यात आल्या आहेत. 

शाळेत जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी काही गोष्टी लक्षात घ्या... 

शाळेचा पहिला दिवस हा सर्वांसाठीच अतीव खास असतो. मित्रमैत्रीणींना बऱ्याच दिवसांनी भेटणं होत असल्यामुळं गप्पांचा ओघ आलाच. पण, विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की शाळेतल्या गप्पा सुरुच राहतील पण, पहिल्या दिवशी शिक्षक देत असणाऱ्या सुचना व्यवस्थित ऐका. शाळेत जायला उशिर करू नका. 

हेसुद्धा पाहा : Ashadhi Ekadashi : माऊलींच्या चरणी सुप्रिया सुळे नतमस्तक; डोक्यावर तुळस घेत वारीत सहभाग 

नवं शैक्षणिक वर्ष म्हटलं की फक्त विद्यार्थ्यांनाच उत्सुकता नसते, तर पालकांनाही या दिवसाची आणि संपूर्ण वर्षाची उत्सुकता असते. तिथं विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी तयार होतानाच त्यांना शाळेत पाठवण्याची तयारी पालक मंडळी करत असतात. विद्यार्थ्यांच्या गणवेशापासून दप्तरापर्यंत आणि रोजच्या डब्यापर्यंतची व्यवस्था पालकांकडूनच केली जाते. त्यामुळं आज राज्यातील शाळा सुरु होण्यासोबतच पालकांची कसरतही सुरु झाली आहे असंच म्हणावं लागेल.  

दरम्यान, रायगडमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळाही आता सुरू होतायत.मात्र शिक्षकांना बदली मान्य नसल्याने 250 शिक्षकांनी मॅटमध्ये धाव घेतलीये. शाळेच्या पहिल्याच दिवशी वर्गात शिक्षक उपलब्ध नाही आहेत. त्यामुळं मुलांसाठी पर्यायी शिक्षकांची व्यवस्था करावी अशा सुचना जिल्हा परिषदेने संबंधित पंचायत समित्यांना दिल्या आहेत.