पोलीस भरतीत 'मुन्नाभाईंची' हायटेक कॉपी, लेखी परीक्षेत 'अशी' पकडली 'भावी पोलिसांची' चोरी

Police Bharti High Tech Copy: एखाद्या विद्यार्थ्याने शाळा किंवा कॉलेजमध्ये कॉपी केली की त्याच्यावर कारवाई केली जाते. वयाचा अल्लडपणा म्हणून त्याकडे पाहिले जाते.पण भविष्यात कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी संभाळण्याची इच्छा असल्याने पोलीस भरतीतच असा प्रकार होत असेल तर?

Updated: Aug 11, 2024, 04:02 PM IST
पोलीस भरतीत 'मुन्नाभाईंची' हायटेक कॉपी, लेखी परीक्षेत 'अशी' पकडली 'भावी पोलिसांची' चोरी title=
लेखी परीक्षेत पकडली 'भावी पोलिसां'ची चोरी (प्रातिनिधीक फोटो)

प्रफुल्‍ल पवार, झी 24 तास रायगड: आजकाल सर्वच क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय ज्‍यामुळे कष्‍ट आणि वेळेची देखील बचत होतेय. पण परीक्षेत कॉपी करण्‍यासाठी देखील नवीन तंत्रज्ञान वापरले जात असल्‍याचा धक्‍कादायक प्रकार डघडकीस आलाय. एखाद्या विद्यार्थ्याने शाळा किंवा कॉलेजमध्ये कॉपी केली की त्याच्यावर कारवाई केली जाते. वयाचा अल्लडपणा म्हणून त्याकडे पाहिले जाते.पण भविष्यात कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी संभाळण्याची इच्छा असल्याने पोलीस भरतीतच असा प्रकार होत असेल तर? रायगडमधून हा गंभीर प्रकार समोर आलाय. इतकंच नव्हे तर ही कॉपी करताना हायटेक पद्धतीचा वापर करण्यात आला होता.

शाळा महाविद्यालयात परीक्षेच्‍यावेळी कॉपी करणे हे पूर्वापार चालत आलेलं आहे. कॉपीसाठी मग कधी चिठठी लिहून ती कपडयात किंवा शूजमध्‍ये लपवणे, शरीराच्‍या काही भागावर पेनाने मजकूर किंवा संदर्भ लिहून ठेवणे असे प्रकार आजही ऐकायला मिळतात, उघडकीस येतात. परंतु कॉपी करण्‍यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय. ऐकून नवल वाटलं ना. पण हे 100 टक्‍के सत्‍य आहे. 

लेखी परीक्षेत सापडले 'मुन्नाभाई'

एखाद्या बॉलिवूडच्या मसालेदार सिनेमाला लाजवेल असा प्रकार पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेत घडला. रायगड पोलीस भरतीमधील लेखी परीक्षेत चक्‍क इलेक्‍ट्रॉनिक डिव्‍हाईसचा वापर करण्‍यात आलाय. होय आणि असा असा डिव्‍हाईसचा वापर करणारे सहा उमेदवार रंगेहात पकडले गेलेत. या उमेदवारांच्‍या कानात तसेच कपड्याच्‍या आत लपवलेले वेगवेगळया प्रकारचे डिव्‍हाईस पोलीस प्रशासनाला तपासणी दरम्‍यान आढळून आल्याची माहिती पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. 

पोलिसांचे काटेकोर लक्ष

ऐन पावसाळयात 391 पदांसाठी भरती प्रक्रिया राबवणाऱ्या रायगड पोलीसांची परीक्षा यंत्रणेवर तीश्रण नजर होती. पावसामुळे भरती पक्रियेत अडथळा येवू नये यासाठी मंडप घालण्यात आले होते. उमेदवारांचे नुकसान होवू नये यासाठी चाचण्‍यांचे वेळापत्रकही बदलले. परंतु लेखी परीक्षेच्या वेळी त्‍यांनी बाळगलेल्‍या सतर्कतेमुळे कॉपी बहाददर उमेदवारांचे बिंग फुटले. 

कोणकोण मदत करीत होतं?

कॉपी रोखण्‍यासाठी यावेळी हॅण्ड हेल्ड मेटल डिटेक्टरचा वापर करण्यात आला. त्यातून हा प्रकार उघडकीस आला आहे. यावेळच्‍या पोलीस भरतीत कॉपीचा हा प्रकार पहिल्‍यांदाच समोर आलाय. आता या उमेदवांरांना त्‍यांनी वापरलेल्‍या डिव्‍हाईसवरून कोणकोण मदत करीत होतं त्‍यांचाही शोध सुरू झालाय. त्‍यांच्‍यावर देखील कारवाई होईलच. चुकीच्‍या गोष्‍टींसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्‍याचा नवा फंडा रायगड पोलीसांच्‍या सतर्कतेमुळे समोर आलाय.