पंतप्रधान मोदी यांचा महादौरा! शिवडी न्हावा शेवा अटल सागरी सेतूसह 30 हजार 500 कोटींच्या प्रकल्पांचं उद्घाटन

PM Modi Maharashtra Visit: मुंबई ट्रान्स हार्बर अटल सागरी सेतूवर 10 किलोमीटर परिघातल्या ग्रामस्थांना टोलमाफी द्या अशी मागणी काँग्रेसने राज्य सरकारकडे केली आहे. 

Updated: Jan 12, 2024, 09:29 AM IST
पंतप्रधान मोदी यांचा महादौरा!  शिवडी न्हावा शेवा अटल सागरी सेतूसह 30 हजार 500 कोटींच्या प्रकल्पांचं उद्घाटन  title=

Mumbai Trans Harbour Link inauguration : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महा.राष्ट्र दौ-यावर येणार आहेत. या महादौ-यात पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून राज्यात 30 हजार 500 कोटींहून अधिक खर्चाच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन करण्यात येणार आहे.. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवडी न्हावा शेवा अटल सागरी सेतूचं उद्घाटन करणार आहेत.. सुमारे 17 हजार 840 कोटींचा हा देशातला सर्वात लांब सागरी सेतू आहे

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला यामुळे वेगवान  कनेक्टिव्हिटी प्राप्त होणार आहे. तसंच मुंबईहून पुणे, गोवा आणि दक्षिण भारतासाठीच्या प्रवासाच्या वेळेत देखील बचत होणार आहे. बहुप्रतिक्षीत दिघा रेल्वे स्टेशनचंही पंतप्रधान उद्घाटन करतील.

नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यासाठी महत्वाचा दिवस 

मुंबई ते रायगड जिल्ह्याला जोडणा-या शिवडी न्हावा शेवा सागरी अटल सेतू या मार्गाचं उद्घाटन होणार आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या जागेवर त्यासाठी भव्य मंडप उभारण्यात आला आहे. कार्यक्रमाला सव्वा लाख नागरिक येणार आहेत ,या कार्यक्रमादरम्यान  प्रधानमंत्री विविध विकासकामांचं लोकार्पण करणार आहेत.  यावेळी प्रधानमंत्री नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ करणार आहेत.  बेलापूर ते पेंधर धावणाऱ्या मेट्रोचे उद्घाटन  ऑनलाईन पद्धतीने करणार आहेत. पूर्व मुक्त मार्गाचे  ( ईस्टर्न फ्री वे )ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह ला जोडणाऱ्या भूमिगत रस्ता बोगद्याची  पायाभरणी करणार आहेत.  उरण रेल्वे स्थानक ते खारकोपर या ईएमयू रेल्वेगाडीला हिरवी झेंडी दाखवून या लोकलसेवेचं उदघाटन प्रधानमंत्री करणार आहेत. ठाणे-वाशी/पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरील नवीन उपनगरीय स्थानक ''दिघा गाव'' तसेच खार रोड आणि गोरेगाव रेल्वे स्थानकादरम्यान नवीन सहाव्या रेल्वेमार्ग राष्ट्रार्पण करणार आहेत.पंतप्रधान नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा शुभारंभ करतील. या अभियानाचा उद्देश महाराष्ट्र राज्यातील महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन आणि उद्योजकता विकासासाठी सक्षम करणे हा आहे. तसेच लेक लाडकी योजनेचा सुरवात करणार आहेत , राज्य आणि केंद्र सरकारच्या महिला विकास कार्यक्रमांचे एकत्रीकरण आणि परिपूर्णता यासाठी या अभियानाद्वारे प्रयत्न केले जाणार आहेत.

मोदी कोणत्या प्रकल्पाचं लोकार्पण आणि उद्घाटन करणार 

  • अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचं उद्घाटन
  • पूर्व मुक्त मार्गावर ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्हला जोडणाऱ्या भूमिगत रस्ता बोगद्याची पायाभरणी
  • ठाणे-वाशी/पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरील दिघा रेस्वे स्टेशनचं उद्घाटन
  • उरण रेल्वे स्टेशन ते खारकोपर ईएमयू रेल्वेगाडीला हिरवा कंदील दाखवणार
  • खार रोड आणि गोरेगाव रेल्वे स्टेशनदरम्यान नवीन सहाव्या रेल्वेमार्गाचं लोकार्पण
  • रत्ने आणि आभूषण क्षेत्राला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून, पंतप्रधान सिप्झ सेझ येथे 'भारतरत्नम' आणि नवीन उपक्रम व सेवा टॉवर (NEST) 01 चे करणार उद्घाटन
  • रेल्वे आणि पेयजलाशी संबंधित अनेक प्रकल्पांचे होणार राष्ट्रार्पण
  • महिला सक्षमीकरणाला अधिक चालना देण्यासाठी पंतप्रधान महाराष्ट्रात नमो महिला सशक्तीकरण अभियानाचा करणार प्रारंभ
  • पंतप्रधान करणार 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन