₹4900 कोटींचे प्रकल्प आणि मोदींचा आजचा यवतमाळ दौरा! राज्यातील 88 लाख शेतकऱ्यांना फायदा

PM Modi In Yavatmal: पंतप्रधान मोदीं महिन्याभराच्या आत पुन्हा एकदा आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसहीत दोन्ही उपमुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रीमंडळ या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Feb 28, 2024, 11:09 AM IST
₹4900 कोटींचे प्रकल्प आणि मोदींचा आजचा यवतमाळ दौरा! राज्यातील 88 लाख शेतकऱ्यांना फायदा title=
पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसहीत संपूर्ण मंत्रीमंडळ उपस्थित राहणार

PM Modi In Yavatmal: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यवतमाळच्या दौऱ्यावर आहेत. येथे आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास नागपूर मार्गावरील डोर्ली शिवारात महिला बचत गटांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार असून दीड ते 2 लाख महिला या कार्यक्रमाला हजेरी लावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान मोदी आजच्या दौऱ्यादरम्यान 4,900 कोटी रुपयांच्या वेगवेगळ्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. यामध्ये वर्धा-कळंब या 39 किलोमीटरच्या ब्रॉडगेज रेल्वे लाइन मार्गाचाही शुभारंभ होणार आहे. तसेच नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा आणि तिसरा हफ्ता वितरित केला जाणार आहे. पीएम किसान सन्मान निधीचा 16 वा हफ्ताही याच कार्यक्रमात वितरित केला जाईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांसहीत संपूर्ण मंत्रीमंडळच हजर राहणार आहे.

या मार्गांचं लोकार्पण होणार

पंतप्रधान मोदींच्या हस्ते वर्धा-कळंब रेल्वे मार्गासहीत प्रवासी रेल्वेचा शुभारंभ केला जाणार आहे. 32 किलोमीटरची अमळनेर-आष्टी ब्रॉडगेज रेल्वे लाइनलाही मोदींच्या हस्तेच हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेबरोबरच बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत विदर्भ व मराठवाड्यासाठी सिंचन योजनांचे लोकार्पण केलं जाणार आहे. या योजनांसाठी 2750 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 753 सालई खुर्द-तिरोरा महामार्गाचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होईल. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930 वरोरा-वणी मार्गाचं चौपदरीकरण, साकोली-भंडाऱ्याला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 सी प्रकल्पाचंही लोकार्पण केलं जाणार आहे. 

निवडणुकींवर डोळा

आगामी लोकसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन फार मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि शुभारंभ पंतप्रधान मोदींच्या हस्ते केला जाणार आहे. या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मागील महिन्याभरामधील पंतप्रधान मोदींचा हा तिसरा महाराष्ट्र दौरा असणार आहे. त्यावरुनच महाराष्ट्राकडे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्राचं विशेष लक्ष असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

नक्की वाचा >> यवतमाळ : मोदींच्या सभेतील खुर्च्यांवर राहुल गांधीचे स्टीकर्स, काँग्रेसला देणगी देण्यासाठी Scan Code

पुतळ्याचं अनावरणही करणार

यवतमाळ शहरामध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला असून याचे अनावरणही पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज होणार आहे. एक कोटी नागरिकांना आयुष्मान भारत योजनेअंतर्गत आयुष्मान कार्ड वितरणाचा शुभारंभ यवतमाळमधील याच कार्यक्रमात होईल. पीएम किसान सन्मान निधी तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनांच्या निधीअंतर्गत राज्यातील सुमारे 88 लाख पात्र शेतकरी कुटुंबांना वितरण केलं जाणार आहे.