PM Modi Yavatmal Rally Chairs With Rahul Gandhi Photo: यवतमाळमध्ये आज दुपारी साडेचारच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. सदर सभेसाठी दीड ते 2 लाख महिला उपस्थित राहणार असल्याने 26 एकरांवर सभा मंडप टाकण्यात आला आहे. मात्र या सभेसाठी केलेल्या तयारीमधील खुर्चांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतलं आहे. पंतप्रधान मोदींच्या सभास्थळी ठेवण्यात आलेल्या खुर्चांच्या मागील बाजूस चक्क सातत्याने भारतीय जनता पार्टीवर टीका करणारे काँग्रेसचे खासदार राहुल गांधींचा फोटो असल्याचं दिसून येत आहे. सदर बाब लक्षात आल्यानंतर आयोजकांची तारंबळ उडाली असून तातडीने हे स्टीकर्स काढण्याचे प्रयत्न सुरु झालेत.
संजय राठोड यांनी 'झी 24 तास'ला दिलेल्या माहितीनुसार, केंद्रातील लोकांनी थेट या खुर्चा आणून सभा स्थळी ठेवल्या. मात्र या खुर्चांवर राहुल गांधींचे स्टीकर्स असल्याचं समजल्यानंतर येथील महायुतीच्या समन्वयकांना निरोप आला. त्यानंतर या मंडपामधील खुर्चांवरील राहुल गांधींचे स्टीकर्स काढण्याचं काम सुरु करण्यात आलं. मात्र मोदींच्या सभेची एवढी जय्यत तयारी केलेली असताना त्यात राहुल गांधींच्या स्टीकर्स खुर्चा दिसल्याने आयोजनामध्ये समन्वयाचा आभाव राहिल्याचं दिसून आल्याची चर्चा आहे. सदर घटना ही येथील स्थानिक केंद्रातील लोकांच्या चुकीमुळे घडल्याचं राठोड यांनी स्पष्ट केलं.
मोदींच्या सभेतील खुर्चांवर लावण्यात आलेल्या स्टीकर्सवर राहुल गांधी नमस्कार करताना दिसत आहेत. त्याच्या बाजूला एक स्कॅन कोडही देण्यात आला आहे. या स्टीकर्सवर “138 वर्षांपासून एका चागंल्या भारताच्या निर्माणासाठी संघर्ष करत आहोत”, असा संदेश काँग्रेसचा प्रचार करण्यासाठी आणि संघर्ष अधोरेखित करण्याच्या उद्देशाने लिहिला आहे. फोटोवरील स्कॅन कोड काँग्रेसला देणगी मिळविण्यासाठी स्कॅन कोडही देण्यात आला आहे. मोदींच्या सभेत काँग्रेसला देणगी देण्यासाठीच्या स्कॅन कोड्सचे स्टीकर्स लागल्याने ही सभा पंतप्रधान नरेंद्र मोदींची की राहुल गांधींची अशी चर्चा स्थानिकांमध्ये आहे.
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावरुन भाजपावर खोचक शब्दात निशाणा साधला आहे. "या स्टीकर्सच्या माध्यमातून भाजपाचे पदाधिकारी तेथील नागरिकांना संदेश देत आहेत. इथं या भाषण ऐका, जेवण करा आणि शेवटी मतदान हे काँग्रेस आणि मित्र पक्षांनाच करा हा संदेश भाजपाचेच नेते देत असतील तर त्याला आम्ही काय करणार? मात्र हा संदेश अधिक योग्य आहे. येत्या काळात भाजपाला सर्व मतदार नाकारतील हे आपल्याला बघायला मिळेल," असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
नक्की वाचा >> ₹4900 कोटींचे प्रकल्प आणि मोदींचा आजचा यवतमाळ दौरा! राज्यातील 88 लाख शेतकऱ्यांना फायदा
आगामी लोकसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन फार मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि शुभारंभ पंतप्रधान मोदींच्या हस्ते केलं जाणार आहे. या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मागील महिन्याभरामधील पंतप्रधान मोदींचा हा तिसरा महाराष्ट्र दौरा असणार आहे. त्यावरुनच महाराष्ट्राकडे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्राचं विशेष लक्ष असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र त्यात हा राहुल गांधींच्या खुर्च्यांचा घोळ झाल्याने उलट सुलट चर्चा सुरु आहेत.
पंतप्रधान मोदी आजच्या दौऱ्यादरम्यान 4,900 कोटी रुपयांच्या वेगवेगळ्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. यामध्ये वर्धा-कळंब या 39 किलोमीटरच्या ब्रॉडगेज रेल्वे लाइन मार्गाचाही शुभारंभ होणार आहे. तसेच नमो शेतकरी महासन्मान योजनेचा दुसरा आणि तिसरा हफ्ता वितरित केला जाणार आहे. पीएम किसान सन्मान निधीचा 16 वा हफ्ताही याच कार्यक्रमात वितरित केला जाईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांसहीत संपूर्ण मंत्रीमंडळच हजर राहणार आहे.