पियुष गोयल यांना महाराष्ट्रातून उमेदवारी? 'या' BJP खासदाराच्या मतदारसंघातून लोकसभा लढणार

Loksabha Election 2024: राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू झाली आहे. आज भाजपकडून दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. 

Updated: Mar 13, 2024, 11:11 AM IST
पियुष गोयल यांना महाराष्ट्रातून उमेदवारी? 'या' BJP खासदाराच्या मतदारसंघातून लोकसभा लढणार title=
Piyush Goyal may contest Lok Sabha elections from North Mumbai

Loksabha Election 2024: महाराष्ट्रातही लोकसभेची रणधुमाळी पाहायला मिळतेच. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागा वाटपाच्या चर्चा सुरू आहेत. काँग्रेसने लोकसभेसाठी दोन याद्या जाहीर केल्या आहेत. तर भाजपही आज उमेदवारांची यादी जाहिर करण्याची शक्यता आहे. त्यापूर्वीच उत्तर मुंबई मतदारसंघातून गोपाळ शेट्टी यांच्या जागेवर मंत्री पीयूष गोयल यांना उमेदवारी देण्याची शक्यता असल्याचे समजतेय. 

भाजप आज लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहिर करु शकते. यात 100 उमेदवारांची नावं असण्याची शक्यता असते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशसह अनेक राज्यातील उमेदवारांची यादी आज जाहिर होऊ शकते. या यादीत महाराष्ट्रातीलही काही उमेदवारांची नावे जाहिर होऊ शकतात, अशी शक्यता आहे. त्यात मंत्री पीयूष गोयल यांचंही नाव असल्याची सूत्रांची माहिती आहे. 

उत्तर मुंबईत गोपाळ शेट्टी यांच्या जागेवर मंत्री पीयूष गोयल यांना उमेदवारी देणार असल्याची निश्चित सूत्रांची माहिती आहे. तर, पूनम महाजन यांच्या जागेवर आशिष शेलार यांच्या नावाची चर्चा आहे . मात्र, शेलार दिल्लीत जाण्यात उत्सुक नसल्याचेही समोर येत आहे. त्याचबरोबर, मनोज कोटक यांच्या जागेवर आमदार पराग शाह आणि विधानपरिषद आमदार प्रवीण दरेकर यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. 

राज्यात महायुतीचा जागावाटप फॅार्मुला तयार 

लोकसभेसाठी राज्यात महायुतीचा जागावाटपाचा फॉर्मुला तयार असल्याची झी 24 तास कडे सूत्रांची माहीती आहे. भाजप ३१, शिवसेना १३, राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागा मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मान राखत त्यांना दोन मतदारसंघातील बदल सूचवत एकूण १३ जागा देणार असल्याचे कळतंय. तर, राष्ट्रवादी काँग्रेसला 4 मतदारसंघ मिळणार आहेत. भाजपच्या केंद्रीय निवडणुक समितीच्या बैठकीत कालरात्री महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघाची सखोल चर्चा झाली. या सर्व मतदारसंघात महायुतीचे कोण उमेदवार निवडुण येऊ शकतात यावर सविस्तर चर्चा झाली. या चर्चेत महायुतीमधील प्रमुख पक्ष भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना कोणते मतदारसंघ सोडायचे आणि त्यांचे उमेदवार देखील कोण असावेत यावरही या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीत भाजप सर्वाधिक ३१ लोकसभा मतदार संघात लढण्यावर निर्णय झाल्याची माहीती वरिष्ठ सूत्रांनी दिलीय. तर शिवसेना पक्षाला १३ लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभे करता येणार आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यातील ४ लोकसभा मतदारसंघात त्यांचे उमेदवार उभे करता येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या उमेदवारांची आणि मतदारसंघाची यादी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वांच्या बैठकीत मांडली होती. त्याच बरोबर त्यांच्या सोबत आलेल्या खासदारांचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांचा मान राखत त्यांना त्यांच्या १३ लोकसभा मतदारसंघातील जागा देण्याचा शब्द दिला आहे.