पिंपरीहून पुण्याला जायचंय? हेल्मेट भाड्याने देणे आहे

स्वतः च्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट घालणं गरजेचं, पण...

Updated: Nov 27, 2018, 11:07 AM IST
पिंपरीहून पुण्याला जायचंय? हेल्मेट भाड्याने देणे आहे title=

कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : गेले काही दिवस पुणे आणि परिसरात चर्चा सुरू आहे ती होऊ घातलेल्या हेल्मेट सक्तीची. एक दिवसासाठी पिंपरीहून पुण्याकडे जायचे तर तेवढ्यासाठी हेल्मेट घ्यायचे का? असा प्रश्न ही अनेकांना पडलाय. पण त्यावर एक उत्तर आहे... इथे हेल्मेट भाड्यानं मिळेल, असं लिहिलेले बोर्ड पिंपरीला सर्रास दिसले तर आश्चर्य वाटून देऊ नका... 

पुणे आणि पिंपरीला जोडणाऱ्या दापोडी मधलं एक छोटंसं दुकान सध्या चर्चेत आहे... दापोडीमध्येच असणाऱ्या लष्कराच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाताना हेल्मेट सक्तीचे आहे. म्हणून २२ वर्षांपूर्वी अंगोळकर यांनी हेल्मेट भाड्याने देण्याची नामी शक्कल लढवली... आता पुण्यात हेल्मेट सक्ती होणार आहे... पण पिंपरी-चिंचव़डमध्ये हेल्मेट सक्ती नाही. मग एखाद वेळेला पिंपरीहून पुण्याला जायचं असेल तर तेवढ्यासाठी हेल्मेट विकत कशाला घ्या, असा प्रश्न पिंपरी-चिंचवडकरांना पडणं स्वाभाविक आहे. म्हणूनच आता पिंपरी-चिंचव़डकरांना पुण्यात जाण्यासाठी डिपॉझिट भरून इथून हेल्मेट भाड्यानं मिळणार आहे.  

स्वतः च्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट घालणं गरजेचं आहे... पण तरीही हेल्मेट घेण्याचा खर्च वाचवायचा असेल आणि पुण्यात गेल्यावर दंड भरावा लागू नये, यासाठी ही भाड्यानं हेल्मेटची सुविधा चांगली आहे.