प्रेयसीला फिरवण्यासाठी 20 वर्षीय युवकाचा अजब प्रताप, ऐकून पोलीसही चक्रावले

प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी तो वेगवेगळ्या गाड्या आणायचा, पण पोलिसांची नजर त्याच्यावर पडली आणि....

Updated: Jul 17, 2022, 10:14 AM IST
प्रेयसीला फिरवण्यासाठी 20 वर्षीय युवकाचा अजब प्रताप, ऐकून पोलीसही चक्रावले title=

कैलास पुरी, झी 24 तास, पिंपरी चिंचवड : प्रेमासाठी कोणत्याही थराला जातात याची काही उदाहरण पाहिली असतील. पण चक्क एक प्रेमवेड्या तरुणाने प्रेयसीसाठी गाड्या चोरण्याचा सपाटाच चालू केला. प्रेयसीला गाडीतून फिरवण्यासाठी तरुणाने अनेक चार चाकी गाड्या आणि दुचाकी देखील चोरल्याचं समोर आलं.

यश किरण सोळसे असं या 20 वर्षीय आशिक चे नाव असून तो मूळचा तळेगावचा रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. सोमनाथ दिवटे आणि विनोद बोडके हे निगडी पोलिस स्थानकातील कर्मचारी गस्त घालत असताना त्यांना एका लाल रंगाची मारुती 800 गाडी संशयास्पदरित्या फिरत असल्याचे दिसले. 

दोघांनी वाहनचालकाला याबाबत विचारणा केली असता तो गाडी घेऊन पळून जाऊ लागला. दिवटे आणि बोडके यांनी पाठलाग करत त्याला पकडले असता त्याचे नाव यश किरण सोळसे असल्याचे चौकशीत समोर आलं.

पोलिस स्थानकात त्याची चौकशी केली. त्याने दिलेली माहिती ऐकून पोलीसही चक्रावले. यश ने सांगवी, निगडी ,देहूरोड या भागातून 2 चार चाकी आणि 13 दुचाकी अशा 15 गाड्या चोरल्या होत्या. गाड्या चोरण्याचं कारण आर्थिक नाही तर प्रेयसीला इम्प्रेस करणं होतं.

 प्रेयसीला फिरवण्यासाठी गाड्या चोरल्याची कबुली यशने दिली. निगडी पोलिसांनी त्याच्या कडून 13 दुचाकी आणि 2 चार चाकी अशा 15 गाड्या ताब्यात घेत 3 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दिवटे आणि बोडके या पोलिस कर्मचाऱ्यांनी केलेल्या कारवाईचे वरिष्ठांकडून कौतुक होत आहे.