पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयाला १५ ऑगस्टचा मुहूर्त

पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन पोलीस आयुक्तालय होणार ही घोषणा झाल्यानंतर प्रेमलोक मधल्या महापालिका शाळेत तात्पुरत्या स्वरूपात पोलीस आयुक्तालय सुरु होणार असं स्पष्ट करण्यात आलं होतं. 

Updated: May 13, 2018, 09:01 PM IST
पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तालयाला १५ ऑगस्टचा मुहूर्त title=

कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये नवीन पोलीस आयुक्तालय होणार ही घोषणा झाल्यानंतर प्रेमलोक मधल्या महापालिका शाळेत तात्पुरत्या स्वरूपात पोलीस आयुक्तालय सुरु होणार असं स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र, त्या जागेला होत असलेल्या विरोधामुळे आयुक्तालयाचा मुहूर्त टळणार अशीच चिन्ह होती. आता मात्र महापालिकेनं त्यावर ठाम भूमिका घेत आयुक्तालय प्रेमलोक पार्क मध्येच होणार असं स्पष्ट केलंय. 

पिंपरी-चिंचवड शहराच्या प्रस्तावित पोलीस आयुक्तालयासाठी काही जागांची पाहणी केल्यानंतर पोलिसांकडून शहराचा मध्यवर्ती भाग असलेल्या प्रेमलोक पार्क मधल्या महात्मा जोतिबा फुले या महापालिकेच्या शाळेच्या जागेची निवड केली. तसं पत्रही महापालिकेला दिलं गेलं. हे प्रस्तावित आयुक्तालय १ मे पासून सुरु करण्याचे ठरलंही होतं. मात्र जागेला होणाऱ्या विरोधामुळं मुहूर्त टळला. आता मात्र महापालिकेनं ठाम भूमिका घेत नवीन आयुक्तालय प्रेमलोक पार्कमधल्या शाळेतच होणार असं स्पष्ट केलंय. तसा प्रस्ताव प्रशासन सर्वसाधारण सभेपुढे लवकरचं ठेवणार आहे. तर सत्ताधारी भाजपनंही आम्ही हा प्रस्ताव कसल्याही परिस्थितीत मंजूर करणार असल्याचं स्पष्ट केलंय.

दुसरीकडे पोलीस प्रशासनाकडून नवीन आयुक्तालय १५ ऑगस्टला सुरु करण्याच्या हालचाली सुरु करण्यात आल्यात. पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी तशी माहिती दिलीय. वास्तविक पोलिस आयुक्तालय होणार या घोषणेनंतर ही शहरातल्या गुन्हेगारीला आळा बसलाय असे नाही. मात्र, किमान आयुक्तालय झालं तर ती कमी होईल या अपेक्षेनं ते लवकरात लवकर सुरु व्हावं असं अनेकांना वाटतंय.