कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड : शनिवारी विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या. आचारसंहिता लागू झाल्यानंतरही अनेकांना सरकारी गाड्यांचा सोस सुटत नाही. मात्र पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव याला अपवाद ठरले आहेत. आचारसंहिता लागू होताच त्यांनी आपले सरकारी वाहन जमा केले आहे.
पिंपरी चिंचवडचे महापौर राहुल जाधव यांचा मूळ व्यवसाय रिक्षाचालकाचा. आयुष्याची सुरुवात त्यांनी रिक्षाचालक म्हणून केली. पण आजही ते त्यांचा मूळचा व्यवसाय विसरले नाहीत. विधानसभेची आचारसंहिता लागू झाल्यानंतर त्यांनी महापालिकेची कार जमा करून टाकली. त्यानंतर महापौरांनी घरी जाण्यासाठी थेट रिक्षाच आणली होती. रिक्षात मागे न बसता त्यांनी रिक्षाच्या पुढच्या सीटवर जागा घेतली. स्टार्टर दाबून कार्यकर्त्यांसह महापौर थेट स्वतःच्या प्रभागाकडे रवाना झाले.
आचारसंहिता संपेपर्यंत आता महापौरसाहेब रिक्षाच चालवणार की काय? असा प्रश्न पिंपरी चिंचवडकरांना पडला आहे.
राहुल जाधव हे व्यक्तिमत्व थोडेसे बहुरंगी बहुढंगी आहे. जेव्हा तुकोबामाऊलींची पालखी पिंपरी चिंचवडमध्ये आली होती, तेव्हा ते थेट तुकोबामाऊलींच्या वेशभूषेत पालखीला सामोरे गेले होते. त्याचे कारणही त्यांनी तसेच दिले आहे.
यापूर्वीही त्यांनी प्रचारात रिक्षा वापरली होती. आता आगामी निवडणुकीच्या प्रचारात रिक्षा चालवून भाजप विरोधकांना किती घाम फोडतील हे पाहावे लागेल.