औसातून मुख्यमंत्र्यांचे स्विय सहायक अभिमन्यू पवार यांचा दणदणीत विजय

लातूर जिल्ह्यातील औसा येथील लक्षवेधी लढत

Updated: Oct 24, 2019, 08:27 PM IST
औसातून मुख्यमंत्र्यांचे स्विय सहायक अभिमन्यू पवार यांचा दणदणीत विजय  title=

शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : महाराष्ट्रातील लक्षवेधी लढतीपैकी लातूर जिल्ह्यातील औसा येथील लढतही लक्षवेधी झाली होती. मुख्यमंत्र्यांचे स्विय सहायक असलेले अभिमन्यू पवार यांना भाजपने उमेदवारी होती. शिवसेनेच्या ताब्यातील हा मतदारसंघ भाजपने स्वतःकडे घेतला होता. ज्यात भाजपचे अभिमन्यू पवार हे जवळपास २७ हजाराहून अधिक मताधिक्यानी निवडून आले आहेत. 

निकाल महाराष्ट्राचा : महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील हे आहेत विजयी उमेदवार

अभिमन्यू पवार यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष माजी राज्यमंत्री बसवराज पाटील मुरुमकर यांचा पराभव केला. बसवराज पाटील हे सलग दोन वेळा औसा मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडून आले होते. मात्र त्यांची विजयाची हॅट्ट्रिक भाजपच्या नवख्या अभिमन्यू पवार यांच्यामुळे हुकली. 

अभिमन्यू पवार यांच्या उमेदवारीनंतर भाजपमध्ये बंडखोरी झाली होती. भाजपचे जिल्हा परिषद सभापती बजरंग जाधव यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली. भूमीपुत्राचा मुद्दा घेऊन ते उभे होते. मात्र औशातील मतदारांनी याला नाकारून भाजपच्या अभिमन्यू पवार यांना २७ हजारांहून अधिकचे मताधिक्य दिले. 

भाजप-शिवसेना  कार्यकर्ते आणि मतदारांच्या आशीर्वादामुळेच हा विजय मिळाल्याची प्रतिक्रिया यावेळी भाजपचे विजयी उमेदवार अभिमन्यू पवार यांनी दिली. एकूणच मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या या मतदारसंघात अभिमन्यू पवारांच्या विजयामुळे एका नव्या पर्वाला सुरुवात झाली आहे एवढं मात्र नक्की.