School Teacher Unwanted Message: विद्यार्थिनीला व्हॉट्सॲप मेसेज करणाऱ्या शिक्षकाविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माझी बोर्डात ओळख असून तुला चांगल्या गुणांनी पास करुण देणार असे तो विद्यार्थीनीला सांगत होता.तू माझ्याशी बोलत जा असे मेसेज तो करायचा. यानंतर मुलीच्या तक्रारीवरुन शिक्षकाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी शिक्षकाला अटक केली आहे. कुठे घडली ही घटना? सविस्तर जाणून घेऊया.
इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीला व्हॉट्सॲपवर रात्री अपरात्री मेसेज पाठवणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 45 वर्षीय वर्गशिक्षकाविरोधात पवनी पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. भोजराज दिघोरे असे अटक झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. तो पवनी येथील वैनगंगा विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहे.
भंडारा जिल्ह्याच्या पवनी शहरातील वैनगंगा विद्यालयातून हा प्रकार समोर आलाय. या शाळेत दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या शिक्षकांनी व्हॉट्सॲप ग्रुपवरुन तिचा मोबाइल क्रमांक घेतला. यानंतर तो तिला रात्री-अपरात्री व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवू लागला. आपली बोर्डात चांगली ओळख असून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण करून देतो असे तो म्हणाला. तू माझ्याशी बोलत का नाही? तू मला आवडते, अशा प्रकारचे लज्जास्पद मेसेज हा शिक्षक करीत होता. या विद्यार्थिनीने यासंदर्भात आपल्या पालकांकडे तक्रार केली होती.
हा गंभीर प्रकार लक्षात आल्यामुळे विद्यार्थिनी शिक्षकाच्या मेसेजवर प्रतिसाद देत नसायची. हे बघून त्या शिक्षकाने तिच्या मैत्रिणीशी संपर्क साधून तिच्या माध्यमातून तिला मेसेज देण्याचाही प्रयत्न केला. यासंदर्भात संबंधित विद्यार्थिनीने पालकांसह पवनी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
यावरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता लैंगिक अपराधापासून बालकाचे संरक्षण अधिनियम 2012 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर रात्रीला भोजराज दिघोरे वर्गशिक्षकाला अटक करण्यात आली. विद्यार्थिनीचा आणि संबंधित शिक्षकाचा मोबाइल पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतला आहे. अधिक तपास पवनी पोलिस करीत आहेत.पोलिस निरिक्षक निलेश ब्राम्हणे यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.