विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : दहावी बारावीला नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे पालक सध्या जाम वैतागले आहेत. वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून काम करणारे हे संजय उमरीकर सध्या त्यांना येणाऱ्या फोन कॉल्समुळं कमालीचे त्रस्त झालेत. त्यांच्या मुलानं दहावीच्या परीक्षेत तब्बल ९५ टक्के गुण मिळवले आणि त्यानंतर त्यांना दिवसातून किमान २५ कॉल यायला सुरुवात झाली. तुमच्या मुलाला आमच्याच कोचिंग क्लासमध्ये टाका, असा आग्रह धरणारे हे फोन असतात. सुरुवातीला अडीच तीन लाख रुपये फी सांगितली जाते आणि मग हळूहळू सवलतीची भाषा करत ती पन्नास हजारांपर्यंत खाली आणली जाते.
फी कमी मिळाली चालेल, पण भविष्यात आपल्या कोचिंग क्लासचं प्रमोशन झालं पाहिजे, हाच हेतू. त्यामुळं हुशार विद्यार्थ्यांचे पालक अक्षरशः जेरीस आलेत.
उमरीकरांसारखीच अवस्था औरंगाबादच्या बिपीन देशपांडेंची. पुन्हा कॉल करू नका, अशी कळकळीची विनंती करावी, तर उत्तरादाखल, एकदा भेट तरी द्या, असं आर्जव ऐकायला मिळतं. या समस्त पालक वर्गाला एकच प्रश्न सतावतो, आमचा नंबर यांना मिळाला कुठून?
बाजारात एखादी वस्तू विकावी, त्या ढंगात या क्लासेसची चर्चा सुरू आहे. त्यामुळं ज्यांची पोरं हुशार, त्यांचे पालक बेजार असं चित्र पाहायला मिळतं आहे.