पंढरपुरात मद्य पाजून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, अत्याचाराचा व्हिडिओ बनवला

ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण पंढरपूर हादरलंय. या प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे

Updated: Aug 17, 2019, 07:28 PM IST
पंढरपुरात मद्य पाजून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, अत्याचाराचा व्हिडिओ बनवला title=

सचिन कसबे, झी २४ तास, पंढरपूर : महाराष्ट्राचं लाडकं दैवत पंढरपूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. यामुळे पूर्ण पंढरपूर हादरलं असून, पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. 

पंढरपूर शहरातल्या अंबाबाई पटांगण इथे सुलभ शौचालय आहे. वारीचा काळ वगळता या ठिकाणचा वापर होत नाही. त्यामुळेच गावगुंड या जागेचा वापर वाईट कृत्यांसाठी वापरतात. याच ठिकाणी डिसेंबर २०१८ मध्ये एका अल्पवयीन मुलीला बोलावून घेऊन तिला बियर पाजून तिच्यावर पाच जणांनी अत्याचार केला.

माऊली तुकाराम अंकुशराव, मनोज दत्तात्रय माने, साहिल सुधीर अभंगराव, अक्षय दिलीप कोळी आणि अरिफ शेख अशी या आरोपींची नावं आहेत. यावरच न थांबता या विकृतांनी अत्याचाराचा व्हिडिओ बनवला... आणि हा व्हिडियो समाज माध्यमांवर दाखवू अशी धमकी देत डिसेंबर २०१८ पासून पीडित मुलीवर वारंवार अत्याचार केला. 

त्यानंतर १५ ऑगस्टला पीडित मुलीच्या वडिलांना फोनवरून धमकी देत त्यांच्याकडे दोन लाख रुपयांच्या खंडणीची मागणीही या पाच आरोपींनी केली, अशी माहिती पंढरपूर पोलीस उपअधिक्षक डॉ. सागर कवडे यांनी दिली. 

समाजात सभ्यतेचा बुरखा पांघरुन अनेक नराधम फिरत असतात. त्यांच्या अत्याचारांना घाबरुन दबून न जाता, धिटपणे पुढे येऊन तक्रार नोंदवण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. त्यामुळेच अशा विकृतांना अद्दल शिकवणं शक्य होणार आहे.