पंढरपुरात बंडखोर बडव्यांनी उभारला वेगळा 'विठ्ठल'

 २०१४ साली सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर बडवे उत्पात सेवाधारी हे मंदिरातून दूर झाले. 

Updated: May 11, 2019, 08:08 AM IST
पंढरपुरात बंडखोर बडव्यांनी उभारला वेगळा 'विठ्ठल'  title=

पंढरपूर : विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भाविकांना अपमानास्पद वागणूक दिल्याच्या तक्रारी वाढत होत्या. याची गंभीर दखल घेत महाराष्ट्र सरकारने कडक पाऊले उचलत न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर २०१४ साली श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातून बडवे दूर झाले होते.  या निकालानंतर दूर झालेल्या बडव्यांनी वैयक्तिक मालकीचे विठ्ठल मंदिर उभारले आहे. सर्वसाधारण भाविकांप्रमाणे त्यांना स्थान मिळाले. त्यानंतर बडवे आक्रमक झालेले पाहायला मिळाले. त्यामुळे आता तुम्ही पंढरपुरात गेल्यावर तुम्हाला दोन विठ्ठल मंदिर दिसू शकतील. अनाथांचा नाथ पंढरीनाथ एकच आहे असे ज्याचे गुणगान आपण गातो तो पंढरी नगरीतच अनेक मंदीरात तो पाहायला मिळेल. त्यामुळे कोणत्या मंदीरात जायचे असा प्रश्नही तुम्हाला पडू शकेल. 

अठ्ठावीस युगे वीटेवर उभा राहून सावळा विठूराया गोरगरीब कष्टकरी भाविकाचे दुखणे, त्रास अडचणी ऐकत आला आहे. आजही तो कटेवर हात ठेवून तसाच उभा आहे. विठ्ठलाचे सेवाधारी असलेल्या बडवे कडून चोखामेळा सारख्या संतालाही त्या काळात त्रास सहन करावा लागला. बडव्यांची उपमा देऊन उदाहरणे आजही दिली जातात. त्यामुळेच नाडकर्णी आयोगाच्या अहवालात  मंदिरात असलेल्या अयोग्य गोष्टींवर प्रकाश टाकला. अखेर २०१४ साली सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर बडवे उत्पात सेवाधारी हे मंदिरातून दूर झाले. पंरपरेने वर्षानुवर्षे विठ्ठलाची सेवा करणाऱ्या बडव्यांना विठ्ठलापासून दूर जावे लागले. 

अनेक शतकांत विठ्ठलाच्या नित्योपचाराची जबाबदारी बडवे यांच्याकडे होती. २०१४नंतर त्यांना सामान्य भाविकाप्रमाणे स्थान उरले. यामुळे देवाचे नित्योपचार,कुलधर्म, उपासना करण्यास अडचणी झाल्या. यामुळेच आज पंढरपुरात बाबा बडवे यांनी आपल्या खाजगी जागेत वैयक्तिक मालकीचे विठ्ठल मंदिर उभारले आहे. नित्योपचार, उपासना करता यावी एवढाच उद्देश असल्याचे बाबा बडवे सांगतात. माझे वैयक्तिक मालकीचे मंदिर असून याला प्रसिद्धी नको आहे. तसेच मूळ देवाच्या मंदिराशी कोणतीही तुलना करू शकत नाही. असं सांगत दुसरं मंदिर उभारण्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

आज जरी पंढरपूरात बडव्यांनी नवं मंदिर उभारले असले तरी यापूर्वी बडवे महाजन यांच्या घरात पहिल्यांदाच ताकपीठे विठोबा मंदिर उभारले होते. त्यामुळे पंढरपुरात विठ्ठल मंदिर उभारणे नव नाही. पण बडवे यांनी उभारल्याने चर्चा झाली तरी त्यांचा तसा उद्देश नसल्याचे सांगतात.