कोल्हापूरला पुन्हा पुराचा धोका! पंचगंगा धोक्याच्या पातळीकडे, रस्त्यांवर पाणीच पाणी

Maharashtra Kolhapur Rain: कोल्हापुरात पुरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 24, 2024, 12:10 PM IST
कोल्हापूरला पुन्हा पुराचा धोका! पंचगंगा धोक्याच्या पातळीकडे, रस्त्यांवर पाणीच पाणी title=
Panchaganga water level to rise to 43 flood situation in kolhapur

Maharashtra Kolhapur Rain: महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. गेल्या काही दिवसांपासून किनारपट्टीपासून ते घाट माथ्यावर मुसळधार पाऊस बरसत आहे. कोल्हापुरातही मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. कोल्हापुर जिल्ह्यात नद्यांची पाणी पातळी वाढत चालली आहे. नदीपात्रातून पाणी बाहेर आल्यामुळं नागरिकांना पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे. पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर आल्यामुळं गगनबावडा शीये रस्तावर पाणी साचले आहे. पाणी रस्त्यांवर आल्याने पुरस्थिती निर्माण झाली आहे. 

पंचगंगा नदी इशारा पातळीवरुन वाहत असल्याने प्रशासनाने नदी काठच्या लोकांना स्थलांतर होण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्हयातील 78 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. अनेक जण कामानिमित्त बाहेर पडल्यानंतर त्यांना पुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कोल्हापूर शहरा जवळ बावडा - शीये गावाला जोडणारा रस्त्यावर देखील पंचगंगा नदीचे पाणी आले आहे. 

कोल्हापूरात नद्या इशारा पातळीवरुन वाहत असल्याने आलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला आहे. मात्र तरीही त्याचा फारसा परिणाम होताना दिसत नाहीये. जिल्हा प्रशासनही अलर्ट मोडवर आहे. पंचगंगा नदीची रात्रीपासून संथ गतीने धोका पातळीकडे वाटचाल सुरू आहे. पंचगंगेची पाणीपातळी 41 फुट 11 इंचावर आहे. तर, पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट तर धोका पातळी 43 फूट आहे. पंचगंगा धोका पातळी गाठण्यासाठी अवघे एक फूट शिल्लक असल्यामुळं सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

महापुराचा फटका बसणाऱ्या चिखली, आंबेवाडी, आरे गावातील लोकांचे स्थलांतर सुरू करण्यात आले आहे. पंचगंगेनी धोका पातळी ओलांडली की शहरातील सुतारवाडा भागात पाणी शिरण्यासाठी सुरुवात होते म्हणून येथील नागरिकांचे चित्रदुर्ग मठात स्थलांतर केले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 23 हून अधिक कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील अनेक मार्गावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामध्ये प्रमुख जिल्हा मार्ग 26, राज्य मार्ग 8, जिल्हा परिषदेकडील 7 मार्ग, ग्रामीण मार्ग 18 मार्गांचा समावेश आहे. कोल्हापूर जिल्ह्याला हवामान खात्याकडून आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम असून  राधानगरी धरण 92% भरल्याने प्रतीसेकंद 1600 क्यूसेक पाण्यचा विसर्ग नदीपात्रात सुरू

कळंबा तलाव भरला

कोल्हापूर शहरा शेजारी असणारा कळंबा तलाव 100 टक्के भरला आहे. सद्या तलावाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. अर्धा कोल्हापूरची तहान भागवनारा तलाव म्हणून काळंबा तलावाला ओळखले जाते.