योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : पालघरात मॉब लिंचींगमध्ये झालेल्या साधू महंत यांच्या हत्येप्रकरणी नाशिक जिल्ह्यात आखाडा परिषदेने चिंता व्यक्त केली आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असल्याचे मत परिषदेने व्यक्त करत हत्येची सर्व दृष्टिकोनातून चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे.
त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनच्या समोर चिकना महाराज बाबा उर्फ कल्पवृक्ष महाराज यांचा दक्षिण मुखी जुना आखाडा आहे. साडेसात एकर परिसरात विस्तारलेला आहे. त्र्यंबकेश्वर मोखाडा या हायवेला लागून असलेल्या या मोक्याचा परिसरावर बांधकाम व्यावसायिकांचा अनेक वर्षांपासून डोळा आहे.
शंभर ते दीडशे कोटी रुपयांची ही जागा परस्पर खरेदी करण्यात आली. ही हत्या या वादातूनपण झाली असू शकते असा संशय त्यांनी व्यक्त केला.
त्र्यंबकेश्वर म्हणजे जुना आखाड्याचे प्राबल्य असलेला परिसर नागा साधू या ठिकाणी नेहमीच डोईजड असतात. संपूर्ण देशामध्ये आखाडा परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा याच आखाड्याचे असतात. त्यामुळे संपूर्ण देशामध्ये या घटनेविरुद्ध संतापाची लाट साधू महंत यांमध्ये पसरली आहे. त्र्यंबकेश्वरच्या आखाडा परिषदेने याबाबत निषेध व्यक्त करत कठोर चौकशीची मागणी केली आहे.
धार्मिक क्षेत्रात पालघरच्या घटनेनं असंतोष पसरला आहे. विशेषता राष्ट्रीय स्तरावर शैव साधूमध्ये याबाबत कडवट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. तसेच महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्थेवर या घटनेमुळे राष्ट्रीय स्तरावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.
याठिकाणी जमिनीचा वाद होता आणि यातून त्यांचं भांडण झालं होतं. हा वाद कोर्टामध्ये असल्याचे शिष्य प्रकाश कावरेने सांगितले. तर
त्र्यंबकेश्वरमध्ये जमिनीला सोन्याचे भाव आले आहेत. अनेक बांधकाम व्यावसायिक ट्रस्टच्या जमिनी गिळंकृत करत आहेत. हा झालेला पालघरचा प्रकारही त्यासंबंधी असू शकतो त्यामुळे यांची चौकशी झाली पाहिजे असे मत सामाजिक कार्यकर्त्या ललिता शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
राज्य सरकारने हे प्रकरण गांभीर्याने पाहावे. मुख्यमंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी त्र्यंबकेश्वर जुना आखाडाचे ठाणा पती महंत विष्णुदास यांनी केली आहे.
सर्व दृष्टिकोनातून येथे चौकशी होणे गरजेचे आहे. पालघरचे पोलीस अधीक्षक यांनाही सहआरोपी केले जावे. कारण यामध्ये पोलिसांनी कुठलीही त्यांची सुरक्षितता बघितलेली नसल्याचे दिसून आले असे मत त्र्यंबकेश्वर आखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष महंत शंकरानंद सरस्वती यांनी व्यक्त केले आहे.