प्रशांत शर्मा / शिर्डी : आतापर्यंत आपण आपल्या मुलांचे वाढदिवस तसेच आपल्या वाडवडिलांची वाढदिवस धुमधडाक्यात साजरे करताना पाहत आलो आहोत.आपल्या कार्याने जगभर प्रसिद्ध असलेल्या बीजमाता पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांनी आपल्या बाळू नावाच्या कुत्र्याचा नुकताच वाढदिवस साजरा केला. (Padma Shri Rahibai Popere celebrated the dog's birthday)
वाढदिवस साजरा करण्याचे विशेष कारण म्हणजे गेली दहा वर्ष बाळू पद्मश्री राहीबाई यांना वेळोवेळी साथ देत आलेला आहे. अनेकदा त्याने घरातील लहान मुलांवर वाघाचा होणारा हल्ला थोपवला आहे तसेच तो परतवून लावलेला आहे .त्यामुळे बाळू कुटुंबातील सर्वांचाच अत्यंत लाडका आणि विश्वासू मानला जातो. याच बाळू वर गेल्या सहा महिन्यात पाच वेळा बिबट्याने हल्ला केल्याचे समजते. नुकतेच बाळूला बिबट्याने आपले लक्ष्य बनवले होते. बाळूला पकडून रात्रभर जंगलात घेऊन गेल्यानंतर बाळू बरोबर झालेली झुंबड व त्यातून बाळूने आपले प्राण वाचतात आपली मालकीण पद्मश्री राहीबाई यांचे घर पुन्हा गाठले.
रात्रभर वाघाच्या ताब्यात असलेला बाळू सुखरूप घरी आल्याचे बघून कुटुंबातील सर्व सदस्यांना अत्यंत आनंद झाला. दहा वर्ष अत्यंत प्रामाणिकपणे दिलेली सेवा व अनेकदा बिबट्याने हल्ला करूनही आपले व कुटुंबातील सदस्यांचे प्राण वाचवलेल्या बाळू बद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्य सरसावले. कुटुंबातील सर्वांनी एकत्र येत बाळूला मिळालेल्या जीवदानाचा आनंद त्याचा वाढदिवस साजरा करत व्यक्त केला.
सर्वप्रथम बाळूला स्वच्छ आंघोळ घालण्यात आली त्यानंतर त्याची पूजा करून अगदी लहान बाळाचा वाढदिवस साजरा करतो त्याप्रमाणे घरात सजावट करून बाळू सह केक कापण्यात आला . घरातील आबालवृद्धांना बाळूसह केक भरवण्यात आला. याप्रसंगी बाळुला गेले दहा वर्ष पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळणार्या पद्मश्री राहीबाई यांनी त्याची विधिवत पूजा करून आपल्या लाडक्या बाळूला केक आणि स्वतःच्या ताटातील जेवण भरवले. याप्रसंगी पद्मश्री राहीबाई अत्यंत भावूक झाल्या होत्या आणि बाळु मूळे आपले स्वतःचे दोनदा प्राण वाचलेले आहेत हा प्रसंग त्यांनी उपस्थित सर्वांना आठवणीने सांगितला. माणसांचे वाढदिवस साजरे करताना आपण सर्वत्र बघतो परंतु एखाद्या प्राण्याविषयी कुटुंबाचे प्रेम आणि जवळीक किती घट्ट असते हेच या प्रसंगातून दिसून येते.