जालन्यात 4 कोटी रुपये खर्चून ऑक्सिजन प्लांट, कोरोनाबाधितांसाठी मोफत 300 ऑक्सिजन सिलिंडर

कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता पडू नये म्हणून उमा स्टील कंपनीने पुढाकार घेतला आहे. 

Updated: Jun 2, 2021, 07:25 AM IST
जालन्यात 4 कोटी रुपये खर्चून ऑक्सिजन प्लांट, कोरोनाबाधितांसाठी मोफत 300 ऑक्सिजन सिलिंडर  title=

नीलेश महाजन / जालना : कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता पडू नये म्हणून उमा स्टील कंपनीने पुढाकार घेतला आहे.  4 कोटी रुपये खर्चून तीस दिवसांत ऑक्सिजन प्लांट सुरु केला आहे. या प्लांटमधून दररोज 300 ऑक्सिजन सिलिंडर मोफत देणार येणार आहेत. (Oxygen plant at Jalna, 300 free oxygen cylinders for corona Patient)

जालन्यातील स्टील कंपन्यांनी ऑक्सिजनची कमतरता कायमची दूर करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पोलाद स्टीलने ऑक्सिजन प्लांट उभा केल्यानंतर औद्योगिक वसाहतीतील उमा स्टीलने देखील ऑक्सिजन प्लांट उभारला आहे. हवेतील ऑक्सिजन शोषून घेणाऱ्या या प्लांटमधून दररोज 500 ऑक्सिजन सिलिंडर तयार केले जात आहेत. यापैकी 300 ऑक्सिजन सिलेंडर कोरोना बाधित तसेच अन्य उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी प्रशासनामार्फत मोफत दिले जात असल्याची माहिती उमा स्टील या कंपनीकडून देण्यात आली आहे.

हा प्लांट उभा करण्यासाठी उमा स्टीलला चार कोटी रुपयांचा खर्च आला आहे. ऑक्सिजनची जिल्ह्यातील कमतरता कायमस्वरूपी दूर करण्यासाठी सर्व स्टील कंपन्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री आणि राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह विभागीय आयुक्तांनी उद्योजकांना केलं होते .यानंतर उमा स्टीलने अवघ्या तीस दिवसांतच  ऑक्सिजन प्लांट विकत घेऊन त्याला कार्यान्वित केलं आहे. दरम्यान, कोरोना बाधितांसाठीच हा प्लांट उभारण्यात आला असून गरजू रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता पडू देणार नाही अशी माहिती उमा स्टीलचे संचालक नीलेश भारुका यांनी दिली आहे. 

जिल्ह्यात ऑक्सिजन अभावी रुग्णांचे हाल होऊ नये म्हणून उमा स्टीलची स्वतःची 200 सिलिंडरची दररोजची गरज पूर्ण करून उर्वरीत 300 सिलिंडर कोरोनाबाधित रुग्णांसाठी मोफत देणं सुरु केलं आहे. यांच्या या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत समाधान व्यक्त केले आहे.